मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने आजपर्यंत प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात.
जेठालाल, टप्पूसेना, डॉ. हाथी, पोपटलाल आणि मराठमोळा एकमेव सेक्रेटरी भिडे हे सर्वच पात्र गेले अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. याच टप्पूसेनेतील मुख्य कलाकार भव्य गांधी याची टप्पू ही भूमिका विशेष गाजली. प्रेक्षकांनी देखील त्याचे भरभरून कौतुक केलं आहे.
तारक मेहता मध्ये भव्यने तब्बल 8 वर्ष टप्पू हे पात्र साकारल्यानंतर 2018 मध्ये त्याने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. भव्यला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. दरम्यान, मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर भव्य काय करतो? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भव्य गांधी ने याबद्दल खुलासा केला आहे. तो पत्रकार असल्याचे भव्यने सांगितले आहे. त्याने गुजराती भाषेमध्ये अनेक लेख लिहिले आहेत. तसेच, गुजराती चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. आता भव्य यूट्यूबवर एक टॉक शो करत आहे.