मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा या लोकप्रिय मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी लवकरच परतणार आहे. दिशा तब्बल दीड वर्षांनंतर या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सप्टेंबर 2017 मध्ये तिने प्रसूती रजा घेतली. त्यानंतर ती मालिकेत परतणार होती. मात्र बाळंतपणानंतर मालिकेत येण्यासाठी तिने निर्मात्यांसमोर काही अटी ठेवल्या होत्या. यात तिने मानधनात वाढ करण्याचंही सांगितले होते. निर्मात्यांनी तिला 30 दिवसांचा अल्टिमेटमसुद्धा दिला होता. पण दिशाकडून काहीच उत्तर न आल्याने त्यांनी दयाबेनच्या भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्रीला निवडल्याचे सांगण्यात येत होते. मात्र अखेर पुन्हा एकदा दिशाच दयाबेनच्या रुपात पाहायला मिळणार आहे. दिशाची तारक मेहतामध्ये ग्रॅण्ड एण्ट्री होणार आहे. गरबा खेळण्याच्या हटके स्टाइलमुळे लोकप्रिय झालेल्या दयाची एण्ट्रीसुद्धा नवरात्रीच्याच पार्श्वभूमीवर होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच दिशा पुन्हा एकदा दयाच्या रुपामध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. विशेष म्हणजे या नवरात्रीमध्ये दयाबेनचा गरबा पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.