कंगना रनौत आणि तापसी पन्नूया दोघींमध्ये गेल्या महिनाभरापासून “कोल्ड वॉर’ सुरू आहे. अशातच आपल्या मिशन मंगल या चित्रपटाला पाठिंबा न देणाऱ्या कंगनावर तापसीने नाराजी व्यक्त केली आहे. तापसी पन्नूसह, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, क्रिती कुल्हारी, नित्या मोहन यांची प्रमुख भूमिका असलेला “मिशन मंगल’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट महिला सबलीकरण, महिला वैज्ञानिकांच मंगळयान मोहिमेतील योगदानावर भाष्य करतो. मात्र कंगनाने या चित्रपटाला पाठिंबा दिला नाही म्हणून तापसी नाराज आहे.
महिलांनीच महिलांना सहाय्य केले पाहिजे, एकमेकांच्या प्रगतीसाठी मदत केली पाहिजे, एकमेकींना पाठिंबा दिला पाहिजे असे कंगनाचे मत आहे. मात्र, या चित्रपटात पाच महिला अभिनेत्री आहेत मग कंगनाने या सिनेमाचे कौतुक का केले नाही? असा प्रश्न तापसीने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विचारला आहे.
यावेळी पुढे ती म्हणाली की, कंगना अभिनेत्री म्हणून मला खूप आवडते. मात्र गेल्या काही दिवसांपासून जो वाद सुरू आहे त्यामुळे मला धक्का बसला आहे. तुमच्या आवडत्या व्यक्तींकडून अशाप्रकारची प्रतिक्रिया येण मुळीच अपेक्षित नसते असही तापसी म्हणाली. दरम्यान अद्याप कंगना कडून यावर कोणतीही प्रतिक्रीया मिळालेली नाही.