पुणे विभागात 757 वर टॅंकर; सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक

पुणे – विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत पाणीटंचाईची भीषणता अधिक वाढली आहे. गेल्या महिन्याभरात तब्बल 250 ने टॅंकरची संख्या वाढली असून, सातारा आणि सांगलीमध्ये चाराटंचाईमुळे बाधीत पशुधनांची संख्या 1 लाखाच्या घरात गेली आहे. एकीकडे पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे तर दुसरीकडे मध्य महाराष्ट्र दिवसेंदिवस तापत असल्यामुळे “अजून किती दिवस वणवण फिरायचे’ अशी भावना दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांची झाली आहे.

माण तालुक्‍यात टॅंकरची संख्या 100 वर
सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण आणि कोरेगाव या चार तालुक्‍यांमध्ये पाणी टंचाई वाढली आहे. जिल्ह्यातील 163 गावे 722 वाड्यांमध्ये 192 टॅंकर सुरू आहेत. एकट्या माण तालुक्‍यात 100 टॅंकर सुरू आहेत. तर कोरेगाव येथे 30 टॅंकर सुरू आहेत. जिल्ह्यात सर्वच तालुक्‍यात बाधित पशुधनाची संख्या 1 लाख 17 हजार इतकी आहे.

सोलापुरात भीषण टंचाई
उन्हाचा चटका वाढल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात पाणी टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तब्बल 223 टॅंकरद्वारे 198 गावे आणि 1 हजार 305 वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. सांगोला, मंगळवेढा, माढा, करमाळा, माळशिरस, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, बार्शी या तालुक्‍यांत पाण्याची स्थिती गंभीर बनली आहे.

पुण्यात पाण्याबरोबरच चाराटंचाई वाढली
पुणे जिल्ह्यात टॅंकरची संख्या पावणेदोनशेवर गेली आहे. बारामती, शिरूर, पुरंदर आणि दौंड तालुक्‍यांत पाण्याची टंचाई अधिक आहे. आता चाराटंचाईही भासू लागल्याने चारा छावण्या सुरू करण्याची मागणी होत आहेत. जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांमधील 89 गावे 860 वाड्यांमध्ये टंचाई असून 2 लाख 70 हजार 994 लोकसंख्येला 163 टॅंकरच्या साह्याने पाणीपुरवठा केला जात आहे.

सांगलीत 179 टॅंकर सुरू
पुणे, सातारा जिल्ह्यापाठोपाठ सांगली जिल्ह्यात टंचाईच्या झळा वाढल्या आहेत. सांगलीच्या सहा तालुक्‍यांतील 173 गावे 1 हजार 71 वाड्यांमधील सुमारे 3 लाख 56 हजारांहून अधिक लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी 179 टॅंकर धावत आहेत. जिल्ह्यातील जत तालुक्‍यातच तब्बल 102 टॅंकर आहेत.

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या चार जिल्ह्यांच्या 38 तालुक्‍यांतील 623 गावे 3 हजार 958 वाड्यांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल 757 टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. टंचाईग्रस्त भागातील सुमारे 13 लाख 46 हजार 789 लोकसंख्या आणि 1 लाख 72 हजार 728 जनावरांची तहान भागविण्यासाठी टॅंकरची धावाधाव सुरू आहे. पाणीपुरवठ्यासाठी 340 विहिरी आणि विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.