वाकड, पिंपळे सौदागर परिसरात 30 टक्के पाण्याची मागणी वाढली
पिंपरी – उन्हाळा सुरू झाल्याने आणि सध्या एक दिवसाआडच पाणीपुरवठा सुरू असल्याने वाकड, पिंपळे सौदागर परिसरात टॅंकरच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. डिसेंबरच्या तुलनेत संबंधित परिसरात पाण्याची मागणी सध्या 30 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. त्यामुळे ज्या सोसायट्यांमध्ये पूर्वी दररोज 8 ते 10 टॅंकर लागत होते. तिथे आता 13 ते 15 टॅंकर लागत आहेत.
शहरामध्ये सध्या दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असल्याचा परिणाम आता उन्हाळ्याच्या सुरुवातीला जाणवू लागला आहे.
दिवसाआड सरासरी 480 दशलक्ष लिटर इतके पाणी महापालिकेकडून पुरविण्यात येत आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केल्याने काही प्रमाणात सोसायटीधारकांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता फेब्रुवारी महिना संपत आला आहे.
उन्हाळा सुरू झाल्याने सोसायट्यांमध्ये असणारे बोअरवेलचे पाणी आटू लागले आहे. त्यामुळे सोसायट्यांना पाण्याची अतिरिक्त मागणी भागविण्यासाठी टॅंकरच्या पाण्यावरच विसंबून राहावे लागत आहे. शहरात 3 हजार 869 सोसायट्या आहेत. या सोसायट्यांना आता पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. विशेषत: वाकड, पिंपळेसौदागर आणि महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांमध्ये या समस्येचे प्रमाण व्यापक आहे. टॅंकर वाढल्यामुळे ज्या सोसायट्यांना टॅंकरसाठी दरमहा 2.40 लाख रुपये मोजावे लागत होते. त्यांना आता दरमहा सरासरी 3.60 लाख रुपये इतकी रक्कम पाण्यासाठी खर्चावी लागत आहे. पिंपळेसौदागर परिसरातही थोड्या-फार फरकाने हीच परिस्थिती आहे. येथील रोझ आयकॉन सोसायटीत पाण्याचे टॅंकर वाढले आहेत.
वाकड परिसरातील सोसायट्यांमध्ये आता उन्हाळा सुरू झाल्यानंतर टॅंकरच्या फेऱ्या वाढल्या आहेत. काही मोठ्या सोसायट्यांमध्ये तर दिवसाला 25 ते 30 टॅंकर इतके पाणी लागत आहे. महापालिकेने सध्या होणारी 40 टक्के पाणी गळती थांबवून याबाबत दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे. प्रति व्यक्ती 135 लिटर पाणी मिळणे आवश्यक आहे.
– के. सी. गर्ग, सरचिटणीस,पिंपरी-चिंचवड गृहनिर्माण सहकारी संस्था फेडरेशन
महापालिका पाणीपुरवठा विभागाने 31 मार्चपर्यंत वाकड परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या येथील सोसायट्यांमध्ये उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची मागणी 30 टक्क्याने वाढली आहे. महापालिकेने विहिरींचे अधिग्रहण केल्यास टॅंकरसाठी सोसायट्यांना कराव्या लागणाऱ्या खर्चात बरीच कपात होऊ शकेल.
– सुदेश राजे, सदस्य, पिंपरी-चिंचवड गृहनिर्माण सहकारी संस्था फेडरेशन