अहमदाबाद – सांघिक कौशल्याचा खेळ करीत तमिळ थलाईवाजने प्रो कबड्डी लीगमध्ये गुजरात फॉर्च्युनजाएंट्सला 34-28 असा पराभवाचा धक्का दिला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच थलाईवाजने विजय मिळविण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवीत खेळावर नियंत्रण घेतले. कबड्डीमध्ये खेळाडूंमध्ये समन्वय कसा ठेवायचा याचा परिपाठ त्यांनी दिला. त्यामुळेच त्यांना गुजरातविरुद्ध हुकुमत गाजविता आली. गुजरातला घरच्या वातावरणात खेळण्याचा फायदा होता. मात्र त्याचे कोणतेही दडपण थलाईवाजने घेतले नाही.
पूर्वार्धात त्यांनी 15-10 अशी आघाडी मिळविली होती. हीच आघाडी त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरली. उत्तरार्धात गुजरातच्या रोहित गुलियाने खोलवर चढाया करीत थलाईवाजची आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. तरीही थलाईवाजने आघाडी राखून विजय मिळविला. त्याचे श्रेय अजय ठाकूर (9 गुण) व मोहित चिल्लर (5) यांच्या चतुरस्त्र खेळास द्यावे लागेल. मनजित चिल्लर व रोहित चौधरी यांनी संघाच्या विजयास हातभार लावला. गुजरातच्या गुलियाने 9 गुणांची कमाई केली. सुनीलकुमार व सचिन यांनी प्रत्येकी 6 गुण मिळविले.