तमिळ थलाईवाज वि. यू पी योद्धा
स्थळ – पाटलीपुत्र क्रीडा संकुल, पाटणा
वेळ – रात्री 7-30 वा.
पाटणा – भरवशाच्या खेळाडूंना सूर गवसलेल्या तमिळ थलाईवाज संघ प्रो कबड्डी लीगमध्ये तिसरा विजय नोंदविण्यासाठी उत्सुक झाला असून त्यासाठी त्यांना यू पी योद्धा संघाच्या आव्हानास आज येथे सामोरे जावे लागणार आहे.
पाटलीपुत्र क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. थलाईवाज संघाने आतापर्यंत चार सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आहेत. येथे त्यांनी हरयाणा संघाविरुद्ध विजय मिळविल्यामुळे त्यांच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले आहे. राहुल चौधरी, अजय ठाकूर व मनजित चिल्लर यांना सूर सापडला ही त्यांच्यासाठी जमेची बाजू असणार आहे. या खेळाडूंना योद्धाचे खेळाडू कसे रोखणार यावरच त्यांचे यशापयश अवलंबून आहे.
योद्धा संघाची या स्पर्धेत आतापर्यंत फारशी चांगली कामगिरी झालेली नाही. त्यांना चार सामन्यांमध्ये तीन लढती गमवाव्या लागल्या आहेत.
तमिळ थलाईवाज –
बलस्थाने – वरिष्ठ खेळाडूंची मांदियाळी, खोलवर चढायांवर माहीर
कच्चे दुवे – पकडींमध्ये अक्षम्य चुका, शेवटच्या टप्प्यात नियंत्रणाचा अभाव
यू पी योद्धा –
बलस्थाने – युवा व अनुभवी खेळाडूंचा समतोल, पल्लेदार चढायांवर हुकमत
कच्चे दुवे – सांघिक कौशल्याचा अभाव पकडींमध्ये नकळत होणाऱ्या चुका