नवी दिल्ली – तमिळनाडूची सी. कवी रक्षना व राजस्थानचा दिव्यांश सिंह पनवार यांनी राष्ट्रीय नेमबाजी सराव स्पर्धेत अनुक्रमे महिला आणि पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात विजेतेपद मिळवले आहे.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली एलाव्हेनिल वालारिवान तसेच टोकियो ऑलिम्पिकला पात्र ठरलेली अपूर्वी चंडेला व अंजूम मुदगिल यांचा सहभाग असूनही कनिष्ठ गटातून पात्र ठरलेल्या कवी रक्षना हिने आश्चर्यकारकरीत्या विजेतेपद पटकावले.
रक्षना हिने अंतिम फेरीत 251.4 गुणांची कमाई करत सुवर्णपदकावर नाव कोरले. राजस्थानच्या निशा कनवार हिला 250.7 गुणांसह रजतपदकावर समाधान मानावे लागले. गुजरातच्या एलाव्हेनिल हिने तिसरे स्थान प्राप्त केले.
पुरुषांमध्ये, पंजाबच्या अर्जुन बबुता याने पात्रता फेरीत 632.1 गुणांसह अग्रस्थान पटकावले होते. पण पनवारने अंतिम फेरीत वर्चस्व गाजवले. त्याने 250.9 गुणांसह सुवर्णपदक प्राप्त केले. महाराष्ट्राच्या रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील याने 249.7 गुणांसह रजतपदक मिळवले.
टी-2 स्किट प्रकारात हरयाणाची रैजा ढिल्लन आणि पंजाबचा अमरिंदर सिंग यांनी अनुक्रमे महिला आणि पुरुष गटाचे जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत रैझाने 60 पैकी 50 वेळा अचूक वेध घेतला. पुरुषांमध्ये अमरिंदर आणि फतेहबिर सिंग शेरगिल यांनी 54 वेळा वेध घेतला. पण अमरिंदरने शूटऑफमध्ये 2-0 अशी बाजी मारली.