Police News: पोलिस कोठडीत झालेल्या बेदम मारहाणीमुळे बाप-लेकाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात मदुराई जिल्हा न्यायालयाने मोठा निर्णय देत 9 पोलिस कर्मचाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात निरीक्षक श्रीधर यांच्यावर 15 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणातील दोषींमध्ये निरीक्षक श्रीधर, उपनिरीक्षक बालाकृष्णन व रघु गणेश तसेच पोलिस कर्मचारी मुरुगन, समदुरई, मुथुराजा, चेल्लादुरई, थॉमस फ्रान्सिस आणि वेइलुमुथु यांचा समावेश आहे. न्यायालयाने निरीक्षणात म्हटले की, “बाप-लेकाला सूडबुद्धीने निर्वस्त्र करून अमानुष मारहाण करण्यात आली. हा प्रकार वाचूनही अंगावर शहारे येतात. न्यायालयाच्या देखरेखीअभावी हे सत्य दडपले गेले असते.” या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज सादर करण्यात आले, जे अशा प्रकरणांमध्ये क्वचितच घडते, असेही न्यायालयाने नमूद केले. हेही वाचा – ममता बॅनर्जी की भाजप, पश्चिम बंगालमध्ये यावेळी कोण स्थापन करणार सरकार? तसेच, तमिळनाडूमध्ये अनेक प्रामाणिक पोलिस अधिकारी आहेत आणि या निर्णयामुळे संपूर्ण पोलिस दलात भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने आरोपींना मृत्यूदंड किंवा पॅरोलशिवाय जन्मठेपेची कमाल शिक्षा देण्याची मागणी केली होती. ही घटना 19 जून 2020 रोजी घडली होती. लॉकडाऊनदरम्यान दुकान वेळेपेक्षा जास्त वेळ उघडे ठेवल्याच्या आरोपावरून व्यापारी पी. जयराज आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स यांना अटक करण्यात आली होती. त्यांना सथानकुलम पोलिस ठाण्यात नेऊन नंतर न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. काही दिवसांतच दोघांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी पोलिस कोठडीत मारहाण केल्याचा आरोप केला होता. या घटनेनंतर मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरुवातीची चौकशी सीबी-सीआयडीकडून करण्यात आली, त्यानंतर प्रकरणाची चौकशी CBI कडे सोपवण्यात आली. तपासादरम्यान एक निरीक्षक, दोन उपनिरीक्षक आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांसह एकूण 10 जणांना अटक करण्यात आली होती. नंतर या सर्वांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.