चेन्नई – राजकारणात सक्रिय झालेले ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा राजकीय हादरा बसला. हासन यांनी स्थापन केलेल्या मक्कल निधी मय्यम या पक्षाचे संस्थापक सदस्य ए.अरूणाचलम यांनी सर्वांना चकित करत भाजपमध्ये प्रवेश केला.
हासन यांची साथ सोडून अरूणाचलम यांनी शुक्रवारी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. नवे केंद्रीय कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. मात्र, हासन यांनी त्या कायद्यांना पाठिंबा दर्शवला नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे अरूणाचलम यांनी स्पष्ट केले.
हासन यांनी 2018 मध्ये मक्कल निधी मय्यमची स्थापना केली. त्या पक्षाचा महत्वाचा चेहरा म्हणून अरूणाचलम यांच्याकडे पाहिले जात होते. हासन आणि त्यांचा पक्ष तामीळनाडूतील आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास सज्ज झाला आहे.
ती निवडणूक पुढील वर्षी एप्रिल-मेमध्ये होणार आहे. अशात एक महत्वाचा मोहरा हासन यांना गमवावा लागला आहे. ती घडामोड हासन यांच्यासाठी राजकीय हादराच मानली जात आहे.