चेन्नई – तमिळनाडूची सी. ए. भवानी देवी टोकियो ऑलिम्पिकला पात्र ठरणारी पहिली भारतीय तलवरबाज ठरली आहे. हंगेरी येथे सुरू असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेतून तिने ही पात्रता मिळविली.
विश्वकरंडक स्पर्धेत तिचे आव्हान दक्षिण कोरियन खेळाडूविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. पण, इथपर्यंत मारलेली मजल तिला ऑलिम्पिकचे तिकीट मिळवून देणारी ठरली. ती जागतिक तलवारबाजी संघटनेच्या मानांकन पद्धतीनुसार ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे.
जागितक मानांकनाच्या 5 एप्रिल 2021 रोजी असणाऱ्या मानांकन स्थितीनुसार आशिया आणि ओशियाना विभागाला दोन वैयक्तिक ऑलिम्पिक प्रवेश मिळणार आहेत. त्यानुसार भवानी पात्र ठरली आहे. भवानी देवी सध्या 45 व्या स्थानावर आहे. जागितक संघटनेकडून 5 एप्रिल रोजी मानाकंन यादी जाहिर झाल्यावर भवानी देवीच्या ऑलिम्पिक प्रवेशावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल.
क्रीडा प्राधिकरणाने ट्विट करून 27 वर्षीय भवानी देवीच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. केंद्रिय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनीही ट्विट करून तिचे अभिनंदन केले आहे. आठ वेळा राष्ट्रीय विजेती ठरलेली भवानी देवी रिओ ऑलिम्पिकला पात्र ठरली नव्हती.
कोविडच्या संकटकाळामुळे ऑलिम्पिक पात्रता थांबविण्यात आली होती. नव्याने ही पद्धती सुरू झाल्यावर भवानीने या वेळी टोकियोसाठी आपली पात्रता सिद्ध केली. भवानी देवी इटलीत प्रशिक्षक निकोला झानोट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणार आहे.
भवानी भारतात थलास्सेरी येथील साईच्या केंद्रात सागर लागू यांच्याकडे प्रशिक्षण घेत होती. तिच्या मेहनती वृत्तीमुळे ती ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली. ती 2012 सालापासून ऑलिम्पिक पात्रतेसाठी प्रयत्न करत होती. भारताचा एखादा तलरवाज खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणे ही पहिलीच वेळ आहे.