मुंबई – बॉलीवूडमधील मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख याने बॉक्स ऑफिसवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तसेच त्याने फिल्म प्रोडक्शनमध्येही चांगले यश मिळविले आहे. आता तो तमन्ना भाटिया स्टारर एका कॉमेडी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे.
विशेष म्हणजे, रितेश देशमुख हा आपल्या आगामी चित्रपटास स्वतः प्रोड्यूस करत आहे. रितेश देशमुख सध्या एका कॉमेडी चित्रपटाच्या प्रोजेक्टवर काम करत असून यात तो मुख्य भूमिका साकारत आहे. यात त्याच्यासोबत मुख्य नायिका म्हणून तमन्ना भाटिया झळकणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
बॉलीवूडमध्ये सध्या कॉमेडी चित्रपटाची चलती असल्याने रितेश आपल्या टीमसह विनोदी चित्रपटावर काम करत आहे. हा चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट तमन्ना भाटियाला आवडली आहे. परंतु अद्याप तिने चित्रपट साइन
केलेला नाही.
दरम्यान, रितेश आणि तमन्ना यांनी 2014मध्ये प्रदर्शित झालेल्या “हमशकल्स’ चित्रपटात एकत्रित काम केले होते. याशिवाय ही जोडी 2013मध्ये एका ऍक्शन कॉमेडी “हिम्मतवाला’मध्येही झळकली होती. आता परत एकदा रितेश आणि तमन्ना यांची कॉमेडी चाहत्यांना पाहावयास मिळणार आहे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास रितेशने यापूर्वी “यलो’, “बालक पालक’, ” माऊली’ आणि “फास्टर फेणे’ यासारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता तो एक कॉमेडी चित्रपटाचे प्रोडक्शन करत असून त्याची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझाही यात काम करण्याची शक्यता आहे.