तालुक्‍याने विकासामागे उभे राहावे : पिचड

अकोले – जनविकास करताना देश निष्ठा भक्कम करणाऱ्या मोदी व देवेंद्र यांच्या पाठीमागे उभे राहणारी ताकद वैभव पिचड यांना मत देऊन भक्कम करावी. मतदारांनी विकासामागे भक्कम ताकद उभी करताना विघातक प्रवृत्तींचा नायनाट करावा. हे करीत असताना वैभव यांना मते देऊन उतरत्या वयामध्ये आपल्याला वैभवच्या मोठ्या मताधिक्क्‌याच्या विजयाची दिवाळी भेट द्यावी, असे आवाहन माजीमंत्री मधुकरराव पिचड यांनी आज सायंकाळी केले.

महायुतीचे उमेदवार वैभव पिचड यांच्या सांगता प्रचार सभेत ते बोलत होते. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा होणार होती. मात्र पावसाच्या रिपरीपीमुळे व ढगाळ वातावरणामुळे ते सभेला येऊ शकले नाहीत. तेव्हा त्यांच्या अनुपस्थितीत पिचड यांनी सामान्यांचे हित आपण चाळीस वर्षे जपले.पण कोणाशीही वैर ठेवले नाही व केले नाही असे स्पष्ट केले. केलेल्या कामांचा त्यांनी आढावा घेतला.

यावेळी राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, शिवाजी धुमाळ, हेमलता पिचड यांच्यासह उमेदवार वैभव पिचड आदी मान्यवर उपस्थित होते. मुस्लिम समाजासाठी वेगळे विद्यापीठ काढण्याच्या सरकारच्या विचाराचे व सावरकर आणि फुले दाम्पत्यांना भारतरत्न देणाऱ्या धोरणाचे स्वागत करून विरोधकांच्या शिव्यांना आपल्या समर्थकांनी आपल्या बाजूनी अधिकाधिक मतदान करून चोख प्रत्युत्तर द्यावे असे आवाहन केले. शिवाय पिचड यांनी मोदी-फडणवीस यांच्या विचारांच्या भक्कम साथीला वैभवला निवडून द्यावे.

बारामतीहून मतदारसंघात युवक आलेले आहेत. त्यांच्या उपस्थितीने मतदारसंघात दुष्कृत्य घडण्याची शक्‍यता त्यांनी व्यक्त केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून मतदानाचा उच्चाक करावा. 21 तारखेच्या मतपेटीतून वैभव यांना मताधिक्‍य देणारे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मतदारांनी कमळ चिन्हाचे बटन दाबावे आणि विरोधी टोळीला त्यांची जागा दाखवून द्यावी असेही शेवटी आवाहन केले.

विखे पाटील यांनी जिल्ह्यामध्ये हे महायुतीचे 12 उमेदवार निवडून येतील व 21 तारखेला संगमनेरचे अस्तित्व संपलेले असेल अशी भूमिका मांडताना त्यांनी कॉंग्रेसचे अस्तित्व संपलेले आहे व राष्ट्रवादी कॉंग्रेसची “खोटे बोल, पण रेटून बोल’ नीती त्यांच्या प्रचार जाहिरातीतून पुढे आली आहे. याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

माजीमंत्री पिचड यांच्याबद्दल दिवंगत खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या भावना मंत्री विखेंनी जाहीर सभेत उद्धृत केल्या. पिचड हे तालुक्‍यातील सामान्यांच्या व आदिवासींच्या हितासाठी कोणतीही तडजोड करणार नाहीत. यापूर्वी केली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवाय निळवंडे संदर्भीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ज्या 20 मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्या पूर्ण करण्याची श्री विखे पाटील यांनी हमी दिली. शरद पवार अजित पवार यांना सामान्य कार्यकर्त्यांचे सोयरसुतक नाही. त्यांची कामे हॉट लाईन वर होतात.

असा टोला मंत्री विखे यांनी लगावला.पण पवारांच्या मागे जाऊन तालुक्‍याचे नुकसान होईल असा इशारा देऊन त्यांनी जिल्ह्याबरोबरच तालुका विकासपर्वा साठी वैभव रावांना मोठे मतदान करावे असे आवाहन केले.आदिवासी आरक्षणाला आम्ही सातत्याने पाठिंबा दिला आहे.आदिवासींच्या आरक्षणात इतरांचा शिरकाव नको अशी आमची भूमिका आहे. तशी भूमिका विरोधकांनी स्पष्ट करावी असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले.खा. लोखंडे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, गायकर, नवले, धुमाळ, जि प गटनेते जालिंदर वाकचौरे, सीताराम भांगरे, मीनानाथ पांडे, भाजप जिल्हाप्रमुख सचिन तांबे, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, गिरजाजी जाधव, वसंत मनकर आदींची यावेळी भाषणे झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.