जयंत कुलकर्णी
नगर – ग्रामीण भागातील मुला-मुलींची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी उंचवावी, या हेतूने तालुकास्तरावर क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र 22 वर्ष झाली तरी अजूनही नगर जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकुलांची उभारणीच सुरू आहे. जिल्ह्यात संगमनेर, पारनेर वगळता अन्य तालुक्यात क्रीडा संकुलाची प्रतीक्षा आहे. राहुरी, पाथर्डी व श्रीरामपूर या तालुक्यात जागाच उपलब्ध झाली नाही. तर उर्वरित तालुक्यात अजूनही बांधकाम सुरू आहे.
अर्थात राहाता, शेवगाव, बुऱ्हाणनगर, कोपरगाव, श्रीगोंदा या ठिकाणी संकुल सुरू झाल्याचा दावा क्रीडा विभागाकडून करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात या संकुलांची कामे अद्यापही सुरू असून शासनाने दिलेल्या एक कोटीचा निधी अखर्चित आहे. त्यातही देखभाल व दुरुस्ती नसल्याने झालेल्या कामांसह संकुलांच्या परिसराची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे सध्या तरी ही क्रीडा संकुले नावालाच असल्याचे चित्र समोर आले आहे.
तालुकास्तरावर क्रीडा संकुल उभारण्यासाठी शासनाने एक कोटीचा निधी उपलब्ध करू दिला होता. परंतु जागा मिळविण्यासह संकुलातील क्रीडा सुविधाचा आराखडा तयार करण्यात संगमनेर वगळता अन्य सर्व तालुक्यांना सरासरी दहा वर्ष लागली.
त्यात राहुरी, पाथर्डी व श्रीरामपूर या तीन तालुक्यांना क्रीडा संकुलासाठी आवश्यक असलेली पाच एकर शासकीय जागाच मिळाली नाही. अजूनही या तालुक्यात जागेचा शोध सुरू आहे. संगमनेरमध्ये सर्वात पहिले 1998 मध्ये संकुलाचे काम पूर्ण झाले. या संकुलात 400 मीटर धावन, बडमिंटन हॉल, कुस्ती हॉल, स्केटिंग, बास्केटबॉल, विविध खेळाची मैदाने तयार आहेत.हे संकुल सध्या देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली नगरपालिकेकडे 99 वर्षांच्या करारावर देण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी क्रीडा समितीपेक्षाही नगरपालिका जे सांगते ते होते. अर्थात नगरपालिकेचे देखील देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष असल्याने या संकुलाची अवस्था दयनीय झाली आहे.
या संकुलाचे विस्तारीकरण करण्यासाठी 4 कोटी निधीची मागणी करण्यात आली आहे.
कोपरगावमध्ये 2003 ला संकुल पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या संकुलावर 75 लाख रुपये खर्च झाले असून उर्वरित 25 लाख अखर्चित आहे. या संकुलात 400 मीटर धावन, बडमिंटन हॉल, बहुउद्देशिय हॉल, विविध खेळाची मैदाने तयार आहेत. या संकुलात अजूनही आसन व्यवस्था नाही. तसेच प्रवेशद्वाराचे काम अद्यापही अपूर्ण आहे. त्यामुळे हे संकुल सुरू असल्याचा दावा करण्यात आला असला तरी या संकुलात वर्दळ कमी आहे. अकोलेत अकोले एज्युकेशन संस्थेने संकुलासाठी 99 वर्षांच्या करारावर जागा दिली होती.
परंतु 2016 मध्ये हा करार रद्द करण्यात आल्याने आता संकुलासाठी दुसरी जागा शोधावी लागत आहे. त्यामुळे येथील संकुलाचा निधी पडून आहे. राहाता तालुक्यातील संकुल नांदुरकी या आठ किलो मीटर अंतरावर असलेल्या गावात संकुल उभारण्यात आले आहे. हे संकुल 2012 मध्ये पूर्ण झाले आहे. 200 मीटर धावन, बहुउद्देशिय हॉल व विविध खेळाचे मैदाने आहेत. मात्र या संकुलाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. संरक्षण भीतीचे काम सुरू आहे. हे राहात्यापासून लांब असल्याने या संकुलाचा किती वापर होतो. हा संशोधनाचा विषय आहे.
पारनेर तालुक्यातील संकुल पूर्ण झाले आहे. 2017 मध्ये काम झाले. 200 मीटर धावन, व्यायाम शाळा, संरक्षण भिंत, बहुउद्देशीय हॉल, विविध खेळाची मैदाने तयार आहेत. सध्या हे संकुलाची देखभाल नगरपंचायत करीत आहे. परंतु संकुलाची दुरवस्था झाली आहे. हे पाहून आमदार नीलेश लंके यांनी संकुलाच्या अद्ययावतेकडे लक्ष दिले असून नुतनीकरणासाठी 5 कोटींचा आराखडा तयार केला आहे.
श्रीगोंद्यातील संकुलाची दयनीय अवस्था झाली आहे.25 लाख रुपये खर्च झाले असले तरी हे संकुल पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. 2008 मध्ये संकुल बांधकाम झाले.200 मीटर धावन, बहुउद्देशीय हॉल व विविध खेळाची मैदाने तयार आहेत.जामखेडमधील संकुलाची अवस्था अतिशय दयनीय आहे. हे संकुल पूर्ण झाल्याचे दावा केला जात असला तरी अद्यापही अनेक कामे अपूर्ण आहेत. बांधकाम खर्चा वाढल्याने तो करणे आता शक्य नाही. त्यामुळे हे बांधकाम रखडले आहे.
या संकुलात 400 मीटर धावन, बहुउद्देशीय हॉल व विविध खेळाची मैदाने तयार आहेत. ती अवस्था कर्जत येथील संकुलाची आहे. दरपत्रक बदल्यामुळे ठेकेदाराला काम करणे शक्य होत नाही. या संकुलासाठी 1 कोटी खर्चा झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र बहुउद्देशीय हॉलच्या छताचे काम अजून बाकी आहे. शेवगावमध्ये 2017 ला संकुल उभारण्यात आले असून आता हे दुरुस्तीला आले आहे. या संकुलावर 72 लाख रुपये खर्च झाले आहे.
नेवासेत 10 लाख खर्च वाया
शहरापासून लांब असल्याने नेवासे येथील क्रीडा संकुलात 10 लाख 37 हजार रुपये खर्चून उभारण्यात आलेले बहुउद्देशीय हॉलवरील खर्च वाया गेला आहे. आता जलसंपदामंत्री शंकरराव गडाख यांनी पुढाकार घेवून हे संकुल आता नेवासे फाटा येथील ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या जागेत भाडे तत्वावर उभारण्यात येणार आहे. तसेच या सध्या संकुलात वीटभट्टी व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत.
अखर्चित निधी परत करण्याचे आदेश
जिल्ह्यात बहुतांशी क्रीडा संकुलांचा निधी अखर्चित आहे. क्रीडा अधिकाऱ्यांनी उपलब्ध झालेला निधी संकुलांच्या बांधकामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला होता. परंतु आज हा निधी खर्च झालेला नसल्याने तो निधी परत करण्याचे आदेश क्रीडा आयुक्तांनी दिल्याने नगर, श्रीगोंदा, कोपरगाव, नेवासे, शेवगाव या तालुक्यांचा निधी परत जाण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत. शासनाने नव्याने संकुलांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करू देण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील काही संकुलांच्या कामांसाठी आवश्यक निधीची मागणी करणार प्रस्ताव पाठविला आहे. त्यानुसार आता तालुकास्तरीय संकुलांसाठी पाच कोटी निधी मिळणार आहे. त्यामुळे अनेक संकुलांची कामे होवून खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळणार आहे.
कविता नावंदे , जिल्हा क्रीडा अधिकारी