चिनाब नदीवरील जगातल्या सर्वात उंच पूलाचे काम पूर्ण

उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला (यूएसबीआरएल) रेल्वे जोड प्रकल्पाचा भाग

नवी दिल्ली – उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला (यूएसबीआरएल) रेल्वे जोड प्रकल्पाचा भाग असलेल्या आणि जगातला सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब नदीवरील पुलाच्या पोलादी कमानीचे काम पूर्णत्वाला नेऊन बांधकाम क्षेत्रातला महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. चिनाब नदीवरच्या पुलाच्या बांधकामातला हा सर्वात अवघड टप्पा होता. कटरा ते बनिहाल दरम्यानच्या 111 किमी लांबीचा टप्पा पूर्ण करण्याच्या दिशेने ही मोठी झेप आहे.

रेल्वेच्या इतिहासात नुकत्याच झालेल्या रेल्वे प्रकल्पांपैकी स्थापत्य अभियांत्रिकी दृष्टिकोनातून सर्वात मोठे आव्हान असलेला हा एक प्रकल्प आहे. 5.6 मीटर लांबीचा धातूचा शेवटचा तुकडा सर्वोच्च टोकाला बसवण्यात आला असून नदीच्या काठाच्या दोन बाजूला असलेल्या भागांना तो जोडण्यात आला. यामुळे 359 मीटर खालून वाहणाऱ्या धोकादायक अशा चिनाब नदीवर कमानीचा आकार पूर्ण झाला आहे.

हे काम पूर्ण झाल्यानंतर आधारासाठीच्या केबल हटवणे, कमानीच्या सांगाड्यात कॉंक्रीट भरणे, पुलाचा पोलादी त्रिकोणी आधार उभारणे, रूळ बसवणे यासारखी कामे हाती घेण्यात येतील. रेल्वे मंत्री पियुष गोयल, रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सुनीत शर्मा, उत्तर रेल्वेचे महासंचालक आशुतोष गांगल यांनी हे ऐतिहासिक काम पूर्णत्वाला जाताना दूर दृश्‍य प्रणाली द्वारे पाहिले.

जम्मू-कश्‍मीरमध्ये भारतीय रेल्वेकडून उभारल्या जात असलेल्या जगातील सर्वाधिक उंचीच्या चिनाब पुलावरील कमानीचे बांधकाम यशस्वीपणे पूर्णत्वाला नेल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुकोद्‌गार काढले आहेत.

आपल्या देशबांधवांची सक्षमता आणि विश्वास यांनी जगाला उदाहरण घालून दिले आहे, असे मोदी यांनी आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे. या बांधकामातील यशस्वितेचे उदाहरण फक्त आधुनिक अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील भारताच्या भीमपराक्रमाचेच उदाहरण नाही तर संकल्प से सिद्धी या नीतीने घडवलेल्या बदलत्या कार्यसंस्कृतीचेही उदाहरण आहे. असे त्यांनी ट्‌विटर संदेशात नमूद केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.