तालेरा रुग्णालयाचे काम संथ गतीने

वर्षभरात 22 टक्केच काम पूर्ण ः सप्टेंबर 2020 पर्यंतची मुदत

काय होणार फायदा

या अद्यावत रुग्णालयामुळे शहरातील नागरिकांना कमी दरात चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळू शकणार आहेत. सध्या महापालिकेच्या वायसीएम व इतर रुग्णालयावर मोठा ताण आहे. चिंचवड येथील तालेरा रुग्णालय सुरू झाल्यास वायसीएम व इतर पालिकेच्या रुग्णालयांवरील ताण कमी होईल व परिसरातील रुग्णांना जवळच्या जवळ उपचार मिळतील. 

पिंपरी – महापालिकेच्या वतीने चिंचवडगाव येथील तालेरा रुग्णालयाची जुनी इमारत पाडून नव्याने उभारण्यात येत असलेल्या इमारतीचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. इमारतीचे काम गेल्या वर्षभरात केवळ 22 टक्के इतके झाले आहे. आत्तापर्यंत या इमारतीचे केवळ दोन स्लॅबपर्यंतचेच बांधकाम पूर्ण झाले आहे.

तालेरा रुग्णालयासाठी 3 मार्च 2018 रोजी कामाचे आदेश देण्यात आले होते. तळमजला आणि पाच मजले अशी भव्य इमारत उभारण्यासाठी कामासाठी 3 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. 58 हजार 476 चौरस फूट क्षेत्रात हे बांधकाम होणार असून आत्तापर्यंत केवळ 2 स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. तसेच, 6 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. कामाची सध्याची प्रगती पाहता दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण होईल का, याविषयी शंका उपस्थित केली जात आहे.

प्रमुख सुविधा – बाह्यरुग्ण विभाग, 12 तपासणी कक्ष, क्ष किरण तपासणी, प्रशस्त प्रतीक्षागृह व स्वच्छतागृह, उपहारगृह, 24 तास फार्मसी, आपत्कालीन ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्‍स, आपत्कालीन अतिदक्षता विभाग, पॅथॉलॉजी लॅब, फिजिओथेरपी, उर्वरित बाह्यरूग्ण विभाग, क्ष किरण तपासणी व सिटी स्कॅन, डे-केअर वॉर्ड (7 खाटा), अद्ययावत ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्‍स – 4, डायलेसिस विभाग, पुरुष व महिलांचा मेडिकल वॉर्ड (36 खाटा), सर्जिकल विभाग (36 खाटा), पॅथॉलॉजी लॅब, प्रशासन विभाग, निवासी वैद्यकीय अधिकारी कक्ष, कान, नाक, घसा व नेत्र विभाग (16 खाटा), अस्थिरोग विभाग (20 खाटा), सभागृह (आसन व्यवस्था – 100) पार्किंग प्रस्तावित – 67 चारचाकी, 85 दुचाकी वाहने. (क्षेत्र – 22 हजार 498 चौरस फूट)

तालेरा रुग्णालयाची जुनी इमारत पाडून नवीन इमारतीचे काम सुरू करताना नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली. त्यामुळे इमारतीच्या पायाभरणीचे काम सुरू होण्यास थोडा वेळ लागला. तथापि, आता या कामात अडथळे नाहीत. दिलेल्या मुदतीत रुग्णालयाचे काम पूर्ण होईल.

चंद्रशेखर धानोरकर, उप-अभियंता, महापालिका

Leave A Reply

Your email address will not be published.