मुंबई – सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असलेले आणि पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पार्टीचे नेते एकनाथ खडसे स्वगृही परत असणार असल्याच्या जोरदार चर्चा जळगाव आणि मुंबईत सुरू झाल्या आहेत. त्याला निमित्त ठरले ते खडसे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतलेली भेट.
खडसे यांनी मात्र शहांची भेट घेतल्याचे मान्य करताना भाजप प्रवेशाचा इन्कार केला आहे. त्यांच्या सूनबाई आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनीही ते येणार आहेत का, याची आपल्याला कल्पना नसल्याचे म्हटले आहे.
खडसे यांनी शहांची भेट घेतल्याचे मान्य करताना शहा यांना भेटू नये असा काही नियम आहे का अशी विचारणा केली. आपण त्यांना यापूर्वीही भेटलो आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनाही भेटलो असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आताची भेट कशासाठी होती ते त्यांनी उघड केले नाही. जळगावच्या आमदारांनी या भेटीची माहिती समोर आणल्यानंतर खडसेंच्या परतीच्या चर्चा सुरू झाल्या.
दरम्यान, याबाबत भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांना विचारले असता जर खडसेंना पक्षात परत घेण्याचा निर्णय अमित शहा यांनी घेतला तर तो भाजपचा निर्णय असेल असे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीकडून आणि फडणवीस यांच्याकडूनही याबाबत काही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.