पुणे – सुट्ट्यांमध्ये दिवाळी अंकांचा आनंद घेण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष दिवाळी अंकदेखील प्रकाशित करण्यात येतात. मात्र, यंदा विद्यार्थ्यांना घरबसल्या अंकातील साहित्य फोन कॉल आणि कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून ऐकता येणार असून, विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोणत्याही इंटरनेट कनेक्शनशिवाय ही संधी मिळणार आहे.
ज्ञानप्रबोधिनीच्या “छात्रप्रबोधन’ बोलक्या दिवाळी अंकाद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत अंकातील साहित्य पोहोचणार आहे. विद्यार्थ्यांना एकदाच नोंदणी करावी लागणार आहे. इंद्रजित भालेराव, एकनाथ आव्हाड, आश्लेषा महाजन आदी लेखकांचे 10 प्रकारांतील साहित्य विनाशुल्क दि.4 डिसेंबरपर्यंत ऐकता येणार असून, दर पाच दिवसांनी हा संच बदलण्यात येतो.
“ऐपावा’ म्हणजेच “ऐका, पाहा आणि वाचा’ याद्वारे अंकातील लिंक्सदेखील पाठवण्यात येतात. मात्र, बोलक्या दिवाळी अंकाद्वारे दुर्गम भागांतील विद्यार्थी साध्या (बटणांच्या) फोनवरून याच्याशी “कनेक्ट’ होवू शकतात. की-पॅडवरील 1 ते 9 क्रमांकानुसार याची रचना आहे. ग्रामीण, वंचित आणि अंध विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवले असून, दररोज हजारो जण साहित्य ऐकत आहेत. दरवर्षी छात्र प्रबोधनचा दिवाळी अंक शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो.
मात्र, यंदा करोनामुळे विद्यार्थ्यांपर्यंत छापील अंक पोहोचविता येणार नाही. पण, इंटरनेट आणि स्मार्टफोन उपलब्ध नसणाऱ्या दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल, यातून ही कल्पना सूचल्याचे “छात्र प्रबोधन’चे संपादक महेंद्र सेठिया यांनी सांगितले. या दिवाळी अंकाचा आनंद घेण्यासाठी 966-771-5716 या क्रमांकावर फोन करावा लागणार आहे.
कम्युनिटी रेडिओवर प्रसारण
राज्यातील विविध भागांतील “कम्युनिटी रेडिओ’वर या दिवाळी अंकातील साहित्याचे प्रसारण केले जाणार असून, रेडिओच्या व्याप्तीनुसार ठराविक वेळेत हे ऐकता येणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये माणदेशी, स्नेहालय, विद्यावाणी आदी 5 ते 6 कम्युनिटी रेडिओवर प्रसारण सुरू होणार आहे.