नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणा येथे आयोजित करण्यात आलेल्या एका प्रचार सभेमध्ये बोलताना आपण आणखीन पाच वर्षांसाठी सत्तेत आल्यास काँग्रेस सुप्रीमो सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांना तुरुंगात धाडू असं वक्तव्य केलं होतं. पंतप्रधानांच्या या वक्तव्याला आता स्वतः रॉबर्ट वढेरा यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.
वढेरा यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून पंतप्रधानांनी आज हरियाणा येथे केलेल्या वक्तव्याचा खरपूर समाचार घेताना, “देशामध्ये गरिबी, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार असे कळीचे प्रश्न असताना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सभांमध्ये माझ्याबाबत बोलतात. याच कारण म्हणजे मोदीजी गेल्या पाच वर्षांमध्ये कसल्याच प्रकारचा विकास करू शकले नसल्याने आपलं अपयश झाकण्यासाठी माझ्यावर वयक्तिक स्वरूपाची टीका केली जात आहे. मी माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी चौकशी यंत्रणांना नेहमीच मदत केली असून माझा या देशातील न्याय व्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे.” असा संदेश लिहिला आहे.