वॉशिंग्टन : नरेंद्र मोदी 2014 मध्ये पंतप्रधान होण्यापूर्वी भारताच्या नेतृत्वात वारंवार बदल होत होते आणि खूप अस्थिरता होती असे विधान अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि आताच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. कॉमेडियन अँड्र्यू शल्त्झ आणि आकाश सिंग यांच्यासोबत फ्लॅग्रंट नावाच्या पॉडकास्टमध्ये ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींची प्रशंसा केली आणि गरजेच्या वेळी कठोर होऊ शकणारा सर्वोत्तम व्यक्ती म्हणून त्यांचे वर्णन केले.
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पुन्हा एकदा रिंगणात उतरलेले ट्रम्प म्हणाले की, मोदी एक चांगले व्यक्ती आहेत आणि गरज पडली तर ते खूप कठोर होऊ शकतात. ते महान आहेत आणि माझे मित्र आहेत. बाहेरून ते असे दिसतात की जणू तुमचे पिता आहेत. ते सगळ्यांपेक्षा चांगले आहेत.
2019 मध्ये ह्यूस्टन, टेक्सासमध्ये झालेल्या हाऊडी मोदी कार्यक्रमाच्या यशाबद्दलही ट्रम्प यावेळी बोलले.
त्यावेळी ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्ष होते. ते म्हणाले, स्टेडियममध्ये लोकांची गर्दी जमली होती. लोक वेडे होत होते आणि आम्ही आजूबाजूला फिरत होतो आणि सगळ्यांशी हात मिळवत होतो. पाकिस्तानच्या संदर्भात अमेरिकेने पाठिंबा देण्याची तयारी दर्शवल्यानंतर मोदी म्हणाले होते की आम्ही (भारत) पाकिस्तानला हाताळू शकतो.
पाकिस्तानचे नाव न घेता ट्रम्प म्हणाले की आमच्यासमोर असे काही प्रसंग आलेत की जेंव्हा कोणीतरी भारताला धमकावत होते. त्यावेळी मी म्हणालो मला मदत करू द्या. माझे त्या लोकांशी चांगले संबंध आहेत. यावर मोदी म्हणाले होते की नाही ते मी करतो. जे आवश्यक असेल ते मी करेन. शेकडो वर्षांपासून आम्ही त्यांचा पराभव केला आहे. दरम्यान, आपल्या 88 मिनिटांच्या दीर्घ मुलाखतीत ट्रम्प यांनी मोदींसोबतच्या त्यांच्या संबंधांबद्दल सुमारे 37 मिनिटे चर्चा केली.