दिलातला बोलपट

सुचरिता : दगड आणि फुलं

कोणे एके काळी, बालतरुणपणी, टीव्ही नामक जादूचा खेळ रोज संध्याकाळी घरात बसून पाहणे अनिवार्य असण्याच्या वेळी, पाहिलेले काहीबाही; आताच्या मन रिकाम वेळी आठवत राहते.

एक माला सिन्हा बाईंचा सिनेमा होता. कर्तबगार, गिरणी मालकाची थोरली मुलगी, जी वडिलांच्या पश्‍चात जबाबदारीने कारखाना, गिरणी किंवा बिझनेस जे काय असेल ते, चालवते आहे. रहमान त्यांचा स्वीय सहायक कम ऑफिसचा सबकुछ ज्याचे बाईंवर प्रेम आहे, ज्याचा की भोळ्यासांब ताईंना बिल्कुल म्हणजे जाम, पत्ताच नाही. निव्वळ निरागस बगा त्या. त्यांना त्यांच्याहून निरागस अशी एक धाकटी कोवळी तनुजा भैण असते. ती तर अनाघ्रात कलिका! आता यांच्यात एक धर्मेंदर येतो जो सुरुवातीला दोन्ही पारड्यात बराब्बर वजन टाकतो. मग अनाघ्रातकडे काटा झुकतो. इकडे थोरल्या जबाबदार ताईबाईंची निस्ती तड फड तळ मळ.

मग त्यागाची मालिका आणि धी येण्डला सब गोड है! तेव्हा पाहताना खूप हसू आल्ते. अरे ह्यो काय खेळ? ती याच्या मागे, तो तिच्या मागे आणि कोण हिच्या मागे! सगळे एकतर्फी प्रेमात तड फड तड फड! अरे दुनियेत इतर माणसे नाहीत काय? काय घोळ. सिनेमा असाच होता की आणि काही हे आता नेमकं आठवत नाहीये. तेव्हा पाहताना असा वाटला आणि जे प्रश्‍न मनात उभे करून गेला, त्याची आता संधीकाली अंधुक अंधुक उत्तरे सापडताहेत असे वाटतेय. कुणी एकच का? तो किंवा तीच का? दुसरी का नाही? प्रतिसाद मिळत नसूनही एकतर्फी तडफडाट का? कुणी जीव लावत असेल तरी त्याची किंमत शून्य ठरवून, न मिळणाऱ्या प्रेमाचा ध्यास का? दिल आ जाता है तो बस… आ जाता है।

और कौनो सवाल माईने नही होता। हे एक शायरछाप उत्तर असलं तरी हेच सगळे प्रत्येक नात्याला लागू पडताना दिसले, की उत्तर सापडावं असं फार वाटतं. नालायक, बेपर्वा मुलांच्या मागे धावणारे आईबाप, नवऱ्याच्या लाथाबुक्‍क्‍या खाऊन त्याच्यासाठी वटपौर्णिमा करणारी बायको, बायको शिवाय इतर काहीही न मोजणाऱ्या भावाची दर राखीला आसुसून वाट पाहणारी बहीण, फेकाड मित्रासाठी जान कुर्बान करणारे मित्र, डोळ्यांदेखत दुसरी सोबत जाणाऱ्या प्रियकरासाठी देवासमोर आशीर्वाद मागणारी प्रेयसी…

सगळ्यांना ह्या प्रश्‍नाचे उत्तर मिळाले तर हवेच आहे की, का? का?
उत्तर मिळाले तरी उकल
सोपी नसेल… नसतेच.
लॉज्जीक्की ऐसी तैसी
देवदास की जात जैसी
क्‍यों का जवाब मिल जाये
किसीकी ऐसी किस्मत कैसी…

आजकाल टीव्हीवर बघण्याच्या लायकीचं फारसं काही लागत नाही. तसंही क्वचितच असतं म्हणा. जेवताना समोर काहीतरी हलतं बोलतं असण्याची परंपरा भारतवर्षात साठसत्तरच्या दशकापासून सुरू झाली. त्यातही जेवताना उगाच हलकं मनोरंजन हवं, फार तापदायक काही नको, असले आपले फंडे. मग आरुनफिरून एकच पर्याय उरतो. गाणी! प्रत्येक भारतीयाच्या रक्‍तात धावणारी हिंदी गाणी! 822च्या आगेमागे रिमोट फिरत राहतो. नवे जुने देखणे जीव म्युझिकवर फडफड करतात. कधी बघायचं, कधी ऐकायचं. आज एक अगदीच राजकपूरवाली कन्यका दिसली. चेहरा कोवळा, वय लहान, देह… अम गम अम… महानच महान! मै तुम्हारी हूँ… असं विविधांगानी आळवून आळवून सांगत होत्या. मन पार मागे कॉलेजमध्ये पोचलं.

कॉलेजमध्ये दर वर्षी एक अनुपम्य सोहळा असतो. ज्यूनिअर कॉलेजचा पहिला दिवस हा कॉलेजचा राष्ट्रीय सण असतो. पार लास्ट ईयरपर्यंतची पोरं त्यादिवशी हजेरी लावतातच. हौशे, नवशे, गवशे सगळे येतात. कोण नुसतंच बघायला, कोण “निदान यंदा तरी’ नशीब आजमवायला. स्वतः अकरावीत असताना हा अनुभव घेतला तेव्हा संध्याकाळी घरी येईपर्यंत जीव पार मेटाकुटीला आला होता. नंतर पुढल्या एका वर्षी मैत्रीण करदावून म्हणाली, क्‍या देखने को आते क्‍या मालूम? त्या वेळी जे सुचलं ते वर्षानुवर्षं अनुभवते आहे. मी पटकन बोलून गेले, नयी उमर की नयी फसल देखने आते है। शायद इस साल काट पाये!

आताशा ही पूररेषा खाली खाली येत दहा अकराला येऊन टेकलीय. दिवसेंदिवस पुराच्या पाण्याला स्वतःच्या विध्वंसक शक्‍तीची धारधार जाणीव होताना दिसते आहे. “मै तुम्हारी हूँ’, म्हणणारी ज्या पद्धतीनं थेट कॅमेऱ्यात डोळे खोचून तुमच्याकडे आरपार आव्हानात्मक बघते; खरं सांगते, कापरं भरतं. ई नई उमर की नई फसल जहरीली लागे है। मग कुठे तरी भांगेत तुळस दिसते. जरा गार वाटतं. सिनेमा ज्या पद्धतीनं आपल्या रक्‍तातच काय, जीन्समधून वाहू लागलाय ते पाहता, पुढच्या पिढ्यांमध्ये मूळचं काही उरणार आहे की नाही; हेच समजेना. मेल ऑर्डर केल्यासारखी फिल्मी पात्र जन्माला येतील बहुदा.
उठाले रे बाबा!

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.