खडकवासला मतदारसंघात तुरळक बाचाबाची, मतदान शांततेत

पुणे – खडकवासला विधानसभा मतदारसंघात काही किरकोळ घटना सोडता सर्व मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. यावेळी वारजे आणि ग्रामीण भागातील तुरळक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याची घटना घडली. तर बंद पडलेल्या ईव्हीएममुळे दहा ते पंधरा मिनिटे त्यात विस्कळीतपणा आला.

मतदानाच्या दिवशी पावसानेही मतदारांना साथ दिल्यामुळे खडकवासला मतदारसंघात 51 टक्‍क्‍यांवर मतदान झाले. दरम्यान, सकाळी पहिल्या दोन तासांत साडेसहा टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदारांची संख्या वाढू लागली. सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत 21 टक्के मतदान झाले.

दुपारनंतर पाऊस झाला तर मतदान केंद्रापर्यंत पोहचता येणार नाही, त्यामुळे निम्म्याहून अधिक मतदारांनी एक वाजेच्या आतच मतदान करून घेतले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 47.38 टक्के मतदान झाले होते. त्यामध्ये 1 लाख 27 हजार 389 पुरूष तर 1 लाख 3 हजार 317 महिला असे एकूण सरासरी 2 लाख 30 हजार 703 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

दरम्यान, दुपारी चार ते सहा वाजेपर्यंत मतदानाचा टक्का वाढला. धायरी परिसरातील मतदान केंद्र क्रमांक 384 आणि 388 मधील मशीन बंद पडण्याची घटना घडली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी तत्काळ मशीन बदलून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू केली. मतदान केंद्राबाहेर ठेवलेल्या सेल्फी फ्रेम घेऊन फोटो काढण्यात मतदार व्यस्त होते.

उमेदवारांनी सकाळीच केले मतदान
खडकवासला मतदारसंघातील महायुती, आघाडी, वंचित बहुजन आघाडी यासह अन्य पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी सकाळीच मतदान करून “श्री गणेशा’ केला. त्यामध्ये महायुतीचे भीमराव तापकीर यांनी धनकवडी येथील प्रियदर्शनी विद्यामंदिर येथे सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. तर आघाडीचे सचिन दोडके यांनी वारजे येथे मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर मतदारसंघातील फिरून जास्तीत जास्त मतदान आपल्याला कसे पडेल, यासाठी यंत्रणा उभी केली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)