बीड – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आज भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. बीड लोकसभा मतदार संघातील उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. आगामी लोकसभेनंतर देशात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या आघाडीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणार असल्याचे सांगत, धनंजय मुंडे यांनी मोदी सरकारने वर्षाला ६००० रुपये देण्याची केलेली घोषणा ही फसवी असल्याचे सांगितले. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आल्यास न्याय योजनेद्वारे दर महिन्याला ६००० रुपये याप्रमाणे वर्षाला ७२ हजार रुपये शेतकऱ्यांना देणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर निशाणा साधत जातीवर नाही तर विकासावर बोलण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच भारतीय जनता पक्षाकडे बोलण्यासारखे काहीही नसल्यानेच ते फक्त लोकांची जातपात काढून मते मागत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
औरंगाबाद येथे गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाची केवळ घोषणा झाली, मात्र त्याची एक वीटही रचली गेली नसल्याचे सांगत, सध्य सरकारने केवळ घोषणाच केल्या आणि वास्तवात कोणतेच काम केले नसल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी यावेळी केला.