“राज्य सरकार बरखास्तीबाबत केंद्राशी बोलू”

राज्यपाल कोश्‍यारी यांचे मारहाण झालेल्या नौदल कर्मचाऱ्याला आश्‍वासन

मुंबई – राज्य सरकार आणि विशेषत: शिवसेनेला लक्ष्य बनवणाऱ्या कंगना राणावत पाठोपाठ शिवसैनिकांनी मारहाण केलेले निवृत्त नौदल कर्मचारी मदन शर्मा यांनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची राजभवनात भेट घेतली. त्यांनी ठाकरे सरकार बरखास्त करण्याची मागणी केली. त्यामुळे राजभवन हे राज्यसरकार विरोधातील कारवायांचे केंद्र बनले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात व्यक्‍त केली जात आहे.

“”या घटनेची मी त्यांना माहिती दिली. तसेच या आरोपींवर लावलेली कलमे किरकोळ असल्याचे मी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकरणात आपण कारवाई करू, असे आश्‍वासन त्यांनी मला दिले. मी राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. त्यांनी (राज्यपालांनी) आपण याबाबत केंद्राशी बोलू, असे मला आश्‍वासन दिले, असे शर्मा यांनी कोश्‍यारींच्या भेटीनंतर पत्रकारांना सांगितले.

दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींना जामीन मिळाला होता. त्यांच्यावर कलम 452 अन्वये काल रात्री पुन्हा अटक करण्यात आली.

दरम्यान, कंगना राणावत या अभिनेत्रीनेही राज्यपाल कोश्‍यारी यांची भेट घेऊन राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडल्याचा दावा केला होता. त्यानंतर ती मुंबईतून हिमाचल प्रदेशात रवाना झाली होती. तिथे गेल्यावर तिने आदित्य ठाकरे यांच्यावरच थेट आरोप केले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी शर्मा यांनी राज्यपालांची भेट घेणे, हा योगायोग नसल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.

शर्मा यांनी केलेल्या मागणीकडे आणि राज्यपालांनी दिलेल्या आश्‍वासनाकडे राजकीय लक्ष वेधत आहेत. त्याचबरोबर कंगना यांनी मुंबईत पाकव्याप्त काश्‍मीरसारखी स्थिती असल्याचे ट्विट केले होते. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पाकव्याप्त काश्‍मीरसारखी स्थिती वाटत असेल तर मुंबईत येऊ नये, असे म्हटले होते. त्यावरून राजकीय वादळ उमटले होते. ही सहज प्रतिक्रिया टोकाला नेण्याची खेळी कोण करत आहे, हे लक्षात येण्यासारखे आहे, असेही एका राजकीय नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले,

Leave A Reply

Your email address will not be published.