युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेला संघर्ष थांबवण्याच्या हेतूने वाटाघाटींचा प्रयत्न म्हणून रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्याशी आपले फोनवरून बोलणे झाले असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. या संदर्भात पुतीन यांच्याशी कितीवेळा बोलणे झाले? असे पत्रकारांनी विचारले असता, ते आपण सांगू शकत नाही, असे उत्तर ट्रम्प यांनी दिले. वॉशिंग्टन पोस्टच्या पत्रकाराशी विमानामध्ये संवाद साधताना त्यांनी ही माहीती दिली.
युद्धभूमीवर ठार झालेल्यांप्रती पुतीन यांना दुःख वाटत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. लोकांना मरताना बघणे थांबले जावे, अशी पुतीन यांची इच्छा असल्याचेही ट्रम्प म्हणाले. युद्धात मरण पावलेले सगळे तरुण, सुंदर लोक होते. ते तुमच्या मुलांसारखे होते. जवळपास २ दशलक्ष लोक या युद्धात मारले गेले आहेत. ते देखील काहीही कारण नसताना मारले गेले आहेत, असे पुतीन म्हणाल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
जर २०२२ मध्ये आपण अमेरिकेचे अध्यक्ष झालो असतो, तर जे युद्ध गेल्या ३ वर्षांपासून सुरू आहे, ते कधी झालेच नसते, असेही ट्रम्प म्हणाले. पुतीन यांच्याशी आपले नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. बायडेन यांचे मात्र तसे नव्हते. बायडेन हे आपल्या देशासाठी एक लाजिरवाणी गोष्ट होते. पुर्णपणे लाजिरवाणी गोष्ट होते, असे त्यांनी जोर देऊन सांगितले.
रशिया आणि युक्रेन दरम्यानचे युद्ध थांबवण्यासाठी आपल्याजवळ ठोस कर्यक्रम आहे. हे युद्ध थांबवले गेलेच पाहिजे. दररोज लोक मारले जात आहेत. युक्रेनसाठी हे युद्ध खूप वाईट आहे. ही वाईट गोष्ट मला थांबवायचीच आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वॉल्ट्झ यांच्याशी बोलताना ट्रम्प यांनी ही चर्चा घडवून आणण्याची सूचनाही केली. हे युद्ध थांबवले गेलेच पाहिजे. तरुण, देखणे सैनिक दररोज मारले जात आहेत. युद्धभूमीवर मारले जात असलेलेले दोन्ही बाजूंचे हे सैनिक माझ्या मुलांसारखेच आहेत, असे उद्घार देखील ट्रम्प यांनी यावेळी काढले.
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स पुढील आठवड्यात म्युनिक सुरक्षा परिषदेत युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेणार आहेत. युक्रेनला अमेरिकेकडून आतापर्यंत दिली जात असलेली मदत थांबवण्याचे सूतोवाच ट्रम्प यांनी केले आहे. अमेरिकेकडून ५०० दशलक्ष डॉलरच्या मदतीला रोखण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयामुळे युक्रेनकडून चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे.
युक्रेनला ही मदत आणि शांतता प्रस्थापनेच्या काळात सुरक्षिततेची हमी देण्याच्या बदल्यात रम्प यांनी युक्रेनमधील खनिज संपत्ती आणि गॅस मिळण्याची अपेक्षा झेलेन्स्की यांच्याकडे केली आहे. रम्प यांचा हा निर्णय पुर्णपणे व्यवहारी असल्याचे निरीक्षकांचे मत आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याकडूनही ट्रम्प यांच्या या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद दिला गेला आहे.
आपण जर अमेरिकेचे अध्यक्ष असतो तर रशिया-युक्रेन संघर्ष झाला नसता. हे युद्ध थांबवण्याचे काम आम्ही शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी अध्यक्ष असतो तर युक्रेन आणि रशिय यांच्यातील युद्ध कधीच सुरू झाले नसते, असे दिनांक २१ जानेवारी रोजी ओव्हल ऑफिसमध्ये स्वाक्षरी समारंभात उपस्थित असताना ट्रम्प म्हणाले होते.