उदयनराजेंचे मौन : पदाधिकाऱ्यांचे कानावर हात, इच्छुकांची तगमग
उपनगराध्यक्ष बदलाची चर्चा
उपनगराध्यक्ष बदलण्याच्याही हालचाली साविआत सुरू आहेत. त्यासाठी किशोर शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. सुहास राजे शिर्के यांची कारकिर्द चांगलीच गाजली. त्यांच्याकडे एक आक्रमक चेहरा म्हणून पाहिले गेले. मात्र, संतुलित व संयमी किशोर शिंदे यांना उपनगराध्यक्षपदासाठी पाचारण करावे हा प्रेमळ आग्रह उदयनराजे यांच्याकडे धरला जात आहे.
सातारा –सातारा विकास आघाडीने सभापती व विषय समित्यांच्या सदस्य निवडीत खांदेपालट केला त्या गोष्टीला दीड वर्ष झाली. उदयनराजे यांच्या खासदारकीनंतर पालिकेत पुन्हा विषय समित्यांच्या निवडी होणार अशी चर्चा सुरू आहे. मात्र, उदयनराजे यांनी बदल प्रक्रियेवर भाष्य न केल्याने इच्छुकांची तगमग वाढली आहे.
यापूर्वी विषय समित्यांच्या निवडी 7 जानेवारी 2018 च्या सभेत झाल्या होत्या. त्यावेळी पाणीपुरवठा सभापतिपदी श्रीकांत आंबेकर, आरोग्य सभापतिपदी यशोधन नारकर, बांधकाम सभापतिपदी मनोज शेंडे, नियोजन समिती सभापतिपदी स्नेहा नलावडे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. अनिता घोरपडे यांची निवड करण्यात आली होती. बावीस सदस्यांपैकी सात जणांना संधी असे तीन वर्ष प्रत्येकाला संधी देण्याचे ठरले होते.
मात्र, सातारा विकास आघाडीतील गटबाजी व लोकसभा निवडणुकांचे महत्व लक्षात घेऊन तब्बल अठरा महिने उपनगराध्यक्षांसह सहा सभापतींना मुदतवाढ मिळाली. ऍड. बनकर पडद्याआडून सक्रिय राहिले व काही ज्येष्ठ नगरसेवकांचा आग्रह उदयनराजे यांना मोडता आला नाही. मात्र, अद्यापही चौदा सदस्यांना प्रतिनिधित्वाची संधी मिळाली नाही, ही तक्रार आहे. त्याकरिता पालिकेत पुन्हा कारभारी बदलाचे वारे वाहू लागले आहेत. मंगळवारी कास तलाव पाहणी व शिवाजी संग्रहालयातील बैठकीनंतर सातारा विकास आघाडीत काही राजकीय हालचाली होतील, अशा अटकळी होत्या. मात्र, उदयनराजे भोसले यांनी सभापती बदलाचा विषय पूर्णपणे बाजूला ठेवला. मंगळवारीसुध्दा सकाळी अकरा वाजता उदयनराजे अचानक पालिकेत आले.
काही दालनांना भेटी देऊन नगराध्यक्षांशी चर्चा केली. त्यांच्यासमवेत ऍड. दत्ता बनकर होते. ज्या वेगाने उदयनराजे आले, त्याच वेगाने निघून गेल.े त्यानंतर पुन्हा सभापती बदलाच्या अफवांना सुरवात झाली. मात्र, दिवसभरात जलमंदिरमधून कोणताही निरोप आला नाही. मुदतवाढ घेऊनही सभापती बदलांचा विषय बाजूला पडू लागल्याने काहीसे नाराजीचे वातावरण असल्याची चर्चा आहे. सभापतीपदी नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी, असा राजकीय सूर उमटू लागला आहे. या विषयावर उदयनराजे यांनीच चुप्पी साधल्याने कोणाच्या नावाची चर्चा हा विषयच लांबणीवर पडला आहे.