अहमदनगर – विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. यासाठी 30 जानेवारीला मतदान होणार आहे. नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक होत आहे. 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. यादरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चांगलीच चर्चेत आहे. नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघात विद्यमान आमदार डॉक्टर सुधीर तांबे हे आहेत. त्यांचा कार्यकाळ 7 फेब्रुवारीला संपणार आहे.
दरम्यान, डाॅ. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांना पक्षशिस्तीचा भंग केला म्हणून काॅंग्रेस पक्षातून निलंबित केले आहे. सुधीर तांबे यांना काॅंग्रसकडून अधिकृत उमेदवारी दिली असताना त्यांनी ऐनवेळी त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच शुभांगी पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार असतील असे जाहीर करण्यात आले आहे.
शुभांगी पाटील आज संगमनेरमध्ये काॅंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. मात्र, थोरात कुटुंबीय सध्या मुंबईत असल्याने त्यांना प्रवेशद्वारातूनच परत जावे लागले. बंगल्यावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना घरी कोणीच नसल्याचे सांगितले. त्यानंतर पाटील आल्या पावली परत गेल्या. बंगल्यावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना ओळखले नसेल आणि थोरात कुटुंबीय मुंबईत असल्याने पाटील यांना तसे सांगून परत पाठविले, असेल असे थोरात यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.
शुभांगी पाटील आशीर्वाद घेण्यासाठी बाळासाहेब थोरातांच्या दारी, पण घरात प्रवेश नाकारला! pic.twitter.com/imhefwIxSC
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) January 20, 2023
नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला गेले असता ते घसरून पडल्याने त्यांचा खांदा दुखवला आहे. त्यामुळे त्यांच्यावर सध्या मुंबईत उपचार सुरू आहे. त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार असल्याने त्यानंतर त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आलेला आहे, असे सांगण्यात आले.
संगमनेरमध्ये थोरात यांच्या निवासस्थानी पाटील यांना प्रवेश नाकारण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह त्या थोरात यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. तेव्हा मुख्य प्रवेशद्वार बंद होते. त्यांनी फटीतून आतील कर्मचाऱ्याशी संवाद साधला. आपला परिचय करून दिला. थोरात किंवा त्यांच्या कुटुंबीयांना भेटायचे असल्याचे सांगितले. मात्र, आतील कर्मचाऱ्याने घरी कोणीच नसून सर्वजण मुंबईला गेल्याचे सांगितले. त्यानंतर पाटील यांनी कोणाला तरी फोन केला.
पलीकडूनही घरी कोणीच नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पाटील यांना तेथून परतावे लागले. यासंबंधीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पाटील यांना थोरात यांच्या घरी प्रवेश नाकारल्याची चर्चा सुरु झाली आहे. तर थोरात यांच्या निवासस्थानी कोणालाही प्रवेश नाकारला जात नाही. सध्या कुटुंबीय घरी नाहीत, तसेच बंगल्यावरील कर्मचाऱ्याच्या कोण आहे, ते लक्षात आले नसेल, त्यामुळे असे घडले असावे, असे थोरात यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.