वैयक्‍तिक टीका करण्यापेक्षा मुद्द्यांवर बोला

आ.पृथ्वीराज चव्हाणांचे मोदींना आवाहन : परिवर्तनाच्या लढाईला आता सुरुवात

सातारा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यात केलेल्या भाषणात साधा विकास शब्द देखील उच्चारला नाही. उलट औरंगजेबाने ज्या प्रमाणे संताजी-धनाजीची धास्ती घेतली होती. तशीच धास्ती मोदींनी पवारांबाबत घेतलेली दिसत आहे. त्यामुळे ते पवारांवर वैयक्तीक टीका करताना दिसून येत आहेत. मात्र, मोदींनी वैयक्तीक टीका करण्यापेक्षा मुद्दयावरच बोलले पाहिजे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी आघाडीचे उमेदवार खा.उदयनराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, आ.बाळासाहेब पाटील, आ. आनंदराव पाटील, सुनील माने, अविनाश रामिष्टे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, मागील निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांच्या पुर्ततेबाबत मोदी बोलत नाहीत. मुद्दयांवरील लक्ष विचलित करण्यासाठी ते वैयक्तीक टीका करण्यावर भर देत आहेत. मात्र, आम्ही निवडणूक मुद्दयांपासून दूर जावू देणार नाही. खरे तर त्यांच्या महाराष्ट्रातील पहिल्याच सभेत त्यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील निवडणुकीत फसवून मते घेतल्याची भावना मतदारांच्या मनात आहे. शेतकऱ्यांसह सर्व घटक त्यांच्यावर नाराज झाला आहे. मेक इन इंडिया अशा योजनांची घोषणा करून मोठी गुंतवणूक करण्याचे आश्‍वासन दिले. त्या आश्‍वासनांची किती पुर्तता झाली? किती युवकांना रोजगार मिळाला ? हे मोदींनी जाहीर करावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

त्याचबरोबर नोटाबंदी, जीएसटीचा मोठा फटका सर्वच घटकांना बसला. आम्ही सत्तेत येताच जीएसटीची प्रक्रिया सोप्पी करणार आहोत. यंदाची निवडणूक परिवर्तनाची आहे. संविधान वाचविण्याची लढाई आहे. अल्पसंख्याक व दलितांवर अत्याचार तर विचारवंतांच्या हत्या केल्या जात आहेत. सर्व रोखून प्रत्येक भारतीयाला संरक्षण देण्याचे काम कॉंग्रेस सरकार करणार आहे. त्यासाठी खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचे सरकार आणायचे असून त्याची लढाई सुरू झाली आहे. त्याची सुरूवात साताऱ्यातून झाली आहे. साताऱ्यातून खा.उदयनराजे यंदा रेकॉर्ड ब्रेक मताधिक्‍क्‍याने निवडून येतील, असा विश्‍वास चव्हाण यांनी व्यक्त केला.

आ. शशिकांत शिंदे यावेळी म्हणाले, सत्तेचा दुरूपयोग करून पक्षांतर करण्याचा घाट भाजपने घातला आहे. निवडणूक सुरू असताना देखील फाईलच्या नावाखाली भिती घातली जात आहे. त्याचबरोबर लोकांच्या आर्थिक अडचणींचा देखील पक्षांतर करून घेण्यासाठी लाभ घेतला जात आहे, असे सांगून शिंदे म्हणाले, सातारा लोकसभा मतदारसंघात खा.शरद पवार, आ. पृथ्वीराज चव्हाण, खा. अशोक चव्हाण, आ. छगन भुजबळ, ना. धनंजय मुंडे यांच्यासह मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन केले जाणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

कुंडल्या माझ्याकडेही आहेत

दरम्यान, विरोधकांच्या कुंडल्या आपल्या हातात आहेत असे मुख्यमंत्री वारंवार सांगतात, त्यावर आ.पृथ्वीराज चव्हाण यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर चव्हाण म्हणाले, कुंडल्यांचा अर्थ फाईल्स असा असतो. त्यांच्याकडेच खरेच काही असेल तर कारवाई करायला हवी होती. मात्र, तसे न करता निवडणूक प्रक्रियेत साम, दाम, दंड, भेद तंत्राचा वापर करून ते निवडणूक जिंकू पहात आहेत, असे स्पष्टीकरण चव्हाण यांनी दिले. त्यानंतर खा.उदयनराजे यांनी संवाद साधताना कुंडल्यांचा उल्लेख केला. ते म्हणाले माझ्याकडे देखील प्रत्येकाच्या कुंडल्या आहेत, असे त्यांच्या शैलीत सांगितले. त्याचबरोबर प्रतिस्पर्धी उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या माथाडी कार्यालयाशेजारी आपले कार्यालय सुरू करण्याचा इशारा दिला. मात्र, ते कार्यालय केवळ पाटील यांच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी असेल असे देखील त्यांनी सांगितले. त्याचबरोबर खा.उदयनराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बातवर टीका केली. ते म्हणाले, मोदी बोलताना एवढे भावना विवश होतात. त्या ओघात ते चुकुन मन की बात बोलून गेले. मात्र, बहुधा त्यांना मन ऐवजी धन असा शब्द उच्चारायचा असावा, असा तर्क खा.उदयनराजे यांनी लावला.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.