अमरिश पुरी यांच्या नातवाची लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री

मुंबई – सिनेसृष्टी हे भन्नाट घटना-घडामोडींचं भांडार आहे. इथं अनेक विक्रमही घडत असतात. तिकीट खिडकीवर जमा होणाऱ्या गल्ल्याच्या विक्रमांविषयी वृत्तपत्रातून नेहमीच बोललं जातं. पण वाचकहो, एका आगामी चित्रपटाच्या नावावर एक अजबगजब विक्रम नोंदवला जाणार आहे. या चित्रपटातून बॉलीवूडचे महान अभिनेते आणि सुप्रसिद्ध खलनायक राहिलेल्या दिवंगत अमरिश पुरी यांचा नातू सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.

ये साली आशिकी असं या चित्रपटाचं शीर्षक आहे. गंमत म्हणजे चित्रपटाची नायिका असणारी शिवालिका हिचादेखील हा पहिलावहिला चित्रपट आहे. आता तुम्ही म्हणाल विक्रमाचं काय? तर मंडळी, या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांचाही हा पहिलाच चित्रपट असणार आहे. त्यामुळे बॉलीवूडमध्ये या चित्रपटाला डेब्यू फिल्म म्हणून संबोधलं जात आहे. या चित्रपटाचं शीर्षक सुरुवातीला पागल असं होतं. परंतु सेन्सर बोर्डाने या शीर्षकावर आक्षेप घेतला. त्यानंतर ते बदलून ये साली आशिकी असे ठेवण्यात आले.

आता हे नवे शीर्षक चित्रपटाच्या कथानकाशी अधिक जवळचे ठरणारे आहे. चित्रपटाची कथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर आधारित आहे. तरुणाचे एकतर्फी प्रेम, त्याला दिलेला तरुणीने नकार, त्यामुळे या तरुणाची वाढती आक्रमकता अशा वळणवाटांनी हे कथानक पुढे जाते. या चित्रपटाचे दिग्दर्शन चिराग रुपारेल करत असून त्यांनी व चित्रपटाचा नायक वर्धन पुरी यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.