सोलापूर: कधी काळी ग्रीन झोनमध्ये असणाऱ्या सोलापूर जिल्ह्याची आता रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच आता जिल्ह्यात मद्य विक्रीची परवानगी दिल्यानंतर ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोलापूर शहरात घरपोच दारू विक्री केली जात आहे तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुकानातून दारू विक्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मद्य विक्री करणाऱ्या दुकानांना नियम आणि अटी लागू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात नियमांचे पालन करून दारू विक्री केली जात आहे. खरेदी करणाऱ्यांसाठी तसेच विक्री करणाऱ्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक आहे.
दुकानासमोर गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग ठेवत मद्य विक्री करणे बंधनकारक आहे. या सोबत प्रत्येक ग्राहकाची थर्मल टेस्ट केली जात आहे. तब्बल 75 दिवसांनी मद्य विक्री सुरू झाल्याने ग्राहकांनी आनंद व्यक्त केला मात्र अपेक्षापेक्षा गर्दी कमी असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.