संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये तालिबानला ‘नो एन्ट्री’

संयुक्त राष्ट्रे – अफगाणिस्तानमधील लोकनियुक्त अशर्रफ घनी यांचे सरकार उलथवून टाकल्यानंतर तालिबान आता तेथील शासक बनले आहे. मात्र संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये अफगाणिस्तानचे प्रतिनिधी म्हणून तालिबान उपस्थित राहू शकणार नाही. संयुक्त राष्ट्रामध्ये पूर्वीच्या घनी सरकारकडून नियुक्त झालेले प्रतिनिधी असेपर्यंत तालिबानला अफगाणिस्तानचे प्रतिनिधी म्हणून आमसभेला उपस्थित राहता येऊ शकणार नाही. पाकिस्तानातील प्रसार माध्यमांनी ही माहिती दिली आहे.

सध्या सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये अफगाणिस्तानला 27 सप्टेंबरला संबोधन करायचे आहे. त्या संदर्भाने तालिबान नियंत्रित अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनिओ ग्युटरेस यांना 20 सप्टेंबर रोजी एक पत्र पाठवून न्यूयॉर्कमधील आमसभेला उपस्थित राहू देण्याची परवानगी मागितली होती.

अफगाणिस्तानचे नवीन परराष्ट्र मंत्री म्हणून तालिबानी नेता आमीर खान मुत्तगी याने या पत्रावर स्वाक्षरी केली आहे. याशिवाय 25 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानचे विद्यमान राजदूत गुलाम इसाकझाई यांनी लिहीलेले पत्रही ग्युटेरेस यांना मिळाले आहे. आपण अजूनही संयुक्त राष्ट्रात अफगाणी प्रतिनिधी म्हणून नियुक्त असल्याने आमसभेमध्ये आपणच उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

त्यानुसार मंगळवारी अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांच्या भाषणाच्यावेळी इसाकझाई हेच उपस्थित राहिले होते. संयुक्त राष्ट्रातील समितीकडून तालिबानबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत तेच अफगाणिस्तानचे संयुक्त राष्ट्रातील प्रतिनिधी राहणार आहेत. त्यामुळे तालिबानी प्रतिनिधी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला ओउोपस्थित राहण्याची शक्‍यता नाही, असे पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.