इस्लामाबाद – पाकिस्तानातील शांततेचे नोबेल विजेती कार्यकर्ती मलाला युसुफजाई हिला तालिबान्यांनी पुन्हा एकदा प्राणघातक हल्ल्याची धमकी दिली आहे. 2012 मध्ये तालिबान्यांनी तिच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. मुलींच्या शिक्षणासाठी मलालाने पाकिस्तानमध्ये मोठे अभियान सुरू केले होते.
त्यामुळे संतप्त झालेल्या तालिबान्यांनी मलालाला संपवण्यासाठी तिच्यावर गोळीबार केला होता. मात्र डोक्यात गोळी घुसूनही मलाला या प्राणघातक हल्ल्यातून बचावली होती. मात्र आता पुन्हा असाच हल्ला केला जाईल आणि यावेळी कोणतीही चूक होणार नाही, असे तालिबानने म्हटले आहे. जर याही हल्ल्यातून ती बचावली तर तिच्यावर पुन्हा हल्ला केला जाईल, असे तालिबानने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तालिबानच्या वरिष्ठ म्होरक्याने हे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. मलाला युसुफजाई मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यात अभियान चालवत असल्यामुळे तिच्यावर हल्ला झाला नव्हता. तर मलाला तालिबानच्याविरोधात प्रचाराचे अभियान चालवत असल्यानेच तालिबानने तिच्यावर हल्ला केला होता, असे अदनान रशिद या तालिबानच्या प्रवक्त्याने ट्विटरवर म्हटले आहे.
मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यामुळे मलालाला 2014 साली शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले. तिच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर पाकिस्तानात पोलिसांच्या कोठडीतून पळून जाण्यात यशस्वी झाला होता.