काबुल – अफगाणिस्तान सरकारने आपल्या ताब्यातील सर्व तालिबानी कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व कैद्यांना आज रात्री मुक्त केले जाणार आहे. त्यानंतर अफगाणिस्तान सरकारचे शिष्टमंडळ दोहा इथे आंतर सरकार पातळीवरील चर्चेसाठी रवाना होणार आहे. राष्ट्रीय सलोख्यासाठीच्या उच्चा परिषदेचे समन्वयक अब्दुल्ला अब्दुल्ला यांचे प्रवक्ते फ्राइदून ख्वाजून यांनी ही माहिती दिली.
केवळ ज्या कैद्यांच्या सुटकेला फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियाकडून विरोध झाला आहे, असे कैदी वगळता अन्य सर्व तालिबानी कैद्यांची सुटका केली जाईल, असे वृत्तसंस्थेला सूत्रांनी सांगितले. फ्रेंच आणि ऑस्ट्रेलियन नागरिकांवरील हल्ल्याप्रकरणी पकडण्यात आलेल्या तालिबानींच्या सुटकेला फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियाने विरोध केला आहे.
तालिबानी कैद्यांच्या सुटकेच्या बदल्यात तालिबानने अफगणिस्तानच्या सैन्यातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंगळवारी रात्रीच सुटका केली आहे. तालिबान आणि अफगाणिस्तान सरकार दरम्यानची चर्चा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल, असे अब्दुल्ला यांनी म्हटले होते.
मात्र या प्रस्तावाला तालिबानकडून कोणताही पाठिंबा दिला गेला नव्हता. शांतता चर्चेसाठी दोन्ही बाजूंकडून कैद्यांची सुटका होणे ही एक प्रमुख पूर्वअट आहे. फेब्रुवारी महिन्यात अमेरिका आणि तालिबानमध्ये झालेल्या करारात ही पूर्वअट दोन्ही बाजूंकडून मान्य करण्यात आली आहे.