काबूल – अफगाणिस्तानमधील पंजशीर खोऱ्यामध्ये तालिबानने 20 नागरिकांची हत्या केली आहे. या खोऱ्यात काही दिवसांपूर्वी तालिबान आणि विरोधी गटांमध्ये तुंबळ संघर्ष झाला होता. तेव्हापासूनच पंजशीर खोऱ्यातील संपर्क यंत्रणा ठप्प पडली आहे. मात्र, बीबीसी वृत्तसंस्थेने या भागात तालिबान्यांकडून नागरिकांची हत्या झाल्याचे वृत्त दिले आहे.
उपलब्ध झालेल्या एका व्हिडिओमध्ये पंजशीरमधील एका रस्त्यावर लष्करी गणवेशातील एका व्यक्तीला तालिबान्यांनी घेरलेले दिसते आहे. थोड्याच वेळात गोळीबाराचा आवाज ऐकू येतो आणि ही व्यक्ती जमिनीवर कोसळलेली दिसते. हा कोण माणूस होता आणि पंजशीरमधील कोणत्या भागात हे हत्याकांड घडले, याचा उलगडा होऊ शकला नाही. अशाप्रकारे किमान 20 जणांची हत्या तालिबान्यांनी केली असल्याचा दावा बीबीसीने केला आहे.
आणखी एका व्हिडिओमध्ये एक गरीब दुकानदार तालिबान्यापुढे गयावया करताना दिसत आहे. मात्र, स्थानिक योद्ध्यांना सिम कार्ड विकण्याच्या आरोपावरून त्याला अटक केली गेली. दुसऱ्या दिवशी त्या दुकानदाराचा मृतदेह घराजवळ बंदुकीच्या गोळ्यांनी छिन्नविछिन्न झालेल्या अवस्थेत सापडला.तालिबानने काबूलवर नियंत्रण मिळवल्यापासून केवळ पंजशीर भागातच तालिबानचे नियंत्रण झाले नव्हते.