काबूल : अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा केल्यानंतर आता महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. मात्र, तालिबानी सतत असा दावा करत आहे, की ते इथल्या लोकांचं आयुष्य अगदी चांगलं बनवणार आहेत. याचदरम्यान, तालिबानच्या कार्यवाहक उच्च शिक्षणमंत्र्यांनी महिलांबाबत मोठी घोषणा केली आहे. अब्दुल बाकी हक्कानी यांनी म्हटले आहे, की तालिबानच्या राजवटीत मुली विद्यापीठात शिकू शकतील. मात्र, या काळात मुला -मुलींचे वर्ग एकत्र चालणार नाहीत.
1990 च्या राजवटीत तालिबान मुलींच्या शिक्षणाच्या पूर्णपणे विरोधात होते. परंतु यावेळी अफगाणिस्तानमध्ये सत्ता मिळवल्यापासून तालिबान सतत आपल्यातील बदलाबद्दल बोलत आहे. त्याच अनुक्रमात तालिबान सरकारमधील कार्यवाहक उच्च शिक्षण मंत्री अब्दुल हक्कानी यांनी मुलींच्या शिक्षणाविषयी बोलले आहे. ते म्हणाले की, अफगाणिस्तानचे लोक शरिया कायद्यानुसार उच्च शिक्षण घेऊ शकतील. परंतु या काळात मुलं आणि मुलींचे वर्ग स्वतंत्रपणे चालतील.
हक्कानी म्हणाले की, तालिबानला इस्लामिक अभ्यासक्रम तयार करायचा आहे. हा अशाप्रकारे तयार केला जाईल जो आपल्या इस्लामिक, राष्ट्रवादी आणि ऐतिहासिक मूल्यांनुसार असेल. त्याचबरोबर इतर देशांशी स्पर्धा करण्यासही सज्ज असेल.
यादरम्यान त्यांनी अफगाणिस्तानातील महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, की महिलांना काम करू शकतात तसंच अभ्यासही करू शकतील. यापूर्वी तालिबानने अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी 10 नियम केले होते. यामध्ये फिंटिंगचे कपडे घालणे, बुरखा न घालता घराबाहेर पडणे, उंच टाचांचे सॅन्डल घालणे, नेल पेंट लावणे आणि सार्वजनिक मेळाव्यात भाग घेणं यावर बंदी होती. तालिबानने आपल्या आदेशात म्हटलं होतं की, जर कोणी महिलांसाठी बनवलेले नियम मोडले तर त्याला क्रूर शिक्षा भोगावी लागेल.