वॉशिंग्टन – पुलित्जर पुरस्कार विजेता भारतीय फोटो जर्नालिस्ट दानिश सिद्दीकी यांचा अफगाणिस्तानमध्ये गोळीबारात मृत्यू झालेला नसून तालिबानने त्यांची ओळख पटल्यानंतर अतिशय क्रुरपणे हत्या केली, असा दावा अमेरिकेच्या मॅगझीनकडून करण्यात आला आहे.
यासंदर्भात नुकताच एक अहवाल सादर करण्यात आला आहे. 38 वर्षीय दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानमध्ये असायनमेंटवर होते, जेव्हा ते मारले गेले. त्यांचा कंधार शहरातील स्पिन बोल्डक जिल्ह्यात अफगाण सैनिक आणि तालिबानमधील संघर्ष कव्हर करताना मृत्यू झाला होता.
“वॉशिंग्टन एक्झामिनर’च्या रिपोर्टनुसार दानिश सिद्दीकी यांनी अफगाण नॅशनल आर्मीच्या टीमसोबत स्पिन बोल्डक परिसरात प्रवास केला. जेणेकरून पाकिस्तान लगतच्या सीमा क्रॉसिंगवर नियंत्रणासाठी अफगाण दले आणि तालिबानमधील सुरू असलेले युद्ध कव्हर करता येईल.
या अहवालानुसार, या हल्ल्यादरम्यान दानिश सिद्दीकी यांना छर्रे लागले आणि यासाठी ते आणि त्यांची टीम एका स्थानिक मशिदीत गेले, जिथे त्यांना प्राथमिक उपचार मिळाले. मात्र, एक पत्रकार मशिदीत असल्याचे समजताच तालिबानने हल्ला केला, असे स्थानिक तपासात समजले.
त्यावेळी दानिश सिद्दीकी जिवंत होते, जेव्हा त्यांना तालिबानने पकडले. तालिबानने दानिश सिद्दीकी यांची ओळख पटवली आणि नंतर त्यांना आणि त्यांच्यासोबतच्या लोकांनाही ठार मारले. कमांडर आणि त्यांच्या टीमच्या इतर सदस्यांचीही हत्या करण्यात आली. कारण त्यांनी सिद्दीकी यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता.