काबूल – क्रिकेट आणि अन्य कोणत्याही क्रीडा स्पर्धांमध्ये महिलांनी सहभागी होण्यास तालिबानने बंदी घातली आहे. या क्रीडा स्पर्धांसाठी घालायच्या कपड्यांमुळे महिलांचे अंग प्रदर्शन होते. त्यामुळे महिलांना अशा कोणत्याच क्रीडा स्पर्धींमध्ये सहभागी होण्यास तालिबानने बंदी घातली आहे. तालिबानच्या सांस्कृतिक कमिशनचा उपप्रमुख अहमदुल्ला वासिक यांने ही माहिती दिली. महिलांसाठी कोणत्याही क्रीडाविषयक उपक्रमांची गरजच नसल्याचे त्याने सांगितले.
गेल्या आठवड्याच्या सुरूवातीला शाळांमध्ये शिकवण्यासाठी केवळ महिलांनाच परवानगी असेल. जर ते शक्य नसेल तर चांगल्या चारित्र्याच्या आणि वयाने ज्येष्ठ पुरुष शिक्षकांना परवानगी दिली जावी असा फतावाही तालिबानने काढला होता.
विद्यापिठांमध्ये शिकणाऱ्या मुलींनी पूर्ण अंगभराचा वेश आणि चाहरा झाकण्यासाठी निकाब घालणे आवश्यक असेल, असेही तालिबानने म्हटले आहे. मुले आणि मुलीचे वर्ग वेगळे भरवले जावेत किंवा दोन्हींमध्ये पडदा असायला हवा, असेही तालिबानने म्हटले आहे. तालिबानची पहिली सत्ता 2001 मध्ये संपुष्टात आल्यानंतर स्थापन झालेल्या सर्व खासगी कॉलेज आणि विद्यापिठांना हा नियम कडकपणे लागू केला जाणार आहे.