काबूल – तालिबानच्या राजवटीला विरोध करणाऱ्या निदर्शकांवर तालिबानने केलेल्या एका हिंसक कारवाईदरम्यान तीन जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना काल जलालाबादमध्ये घडली.
अफगाणिस्तानला 19 ऑगस्ट 1919 रोजी ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले होते. त्या स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी ध्वजारोहणासाठी जलालाबादमध्ये हजारो जमलेले होते. या भागात तालिबान्यांनी फडकावलेला तालिबानचा ध्वज या नागरिकांनी खाली उतरवला. तालिबानने जे भाग ताब्यात घेतले त्या सर्वच ठिकाणी पांढऱ्या रंगावर अरबी लिपीतील घोषणा लिहिलेले हे ध्वज उभे केले गेले आहेत.
तालिबानी ध्वज खाली उतरवला गेल्यावर तालिबान्यांनी या नागरिकांवर हल्लाच केला. हवेत गोळीबार करत या समुदायावर जोरदार लाठीमार करण्यात आला. याचा व्हिडिओ नंतर प्रसिद्ध झाला. तालिबानची ही मुजोरी टिपण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनाही मारहाण करण्यात आली. या हिंसक कारवाईमध्ये किमान एक जण ठार झाला आणि सहा जण जखमी झाले.
अमेरिका आणि मित्र राष्ट्रांचा बालेकिल्ला असलेल्या काबूलच्या उत्तरेकडील पंजशीर व्हॅलीमध्येही स्थानिकांनी तालिबानला विरोध करण्याचे आवाहन केले आहे. असे आवाहन करणाऱ्यांमध्ये अध्यक्षपदावर दावा करणारे अमरुल्ला सालेह, संरक्षण मंत्री जनरल बिस्मिल्ला अहमदी आणि नॉर्दर्न अलायन्सचे नेते अहमद शाह मसूद यांचे पुत्र अहमद मसूद यांचाही समावेश आहे. त्यांनी तालिबानला थेट आव्हान दिले की नाही हे समजू शकलेले नाही. तालिबानला अद्याप या प्रांतावर ताबा मिळवता आलेला नाही.