दहा जवान ठार
कंदहार : तालिबानी गनिमांनी अफगाणिस्तानच्या हेलमंड प्रांतातील एका लष्करी तळावर हल्ला करून दहा जवानांना ठार मारल्याची घटना आज घडल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
या हल्ल्याच्या संबंधात माहिती देताना संबंधीतांनी सांगितले की तालिबानी गनिमांनी बोगदा खणून त्याद्वारे लष्करी तळावर प्रवेश मिळवला आणि त्यांच्या गनिमांनी तेथे बॉंम्ब हल्ले आणि गोळीबार केला. हा हल्ला झाला त्यावेळी तेथे एकूण 18 जवान होते. त्यावेळी दहा जवान ठार झाले, चार जण जखमी झाले तर उर्वरीत चार जवानांनी अत्यंत धाडसी प्रतिक्रार करीत हल्लेखोरांना पिटाळून लावले.
हल्लेखोरांनी जवानांना काहीं कळायच्या आत तेथे मोठा बॉंम्बस्फोट केला त्यात दहा जवान जागीच ठार झाले. तालिबानचा प्रवक्ते झैबुल्लाह मुजाहिदीन याने या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून तसे निवेदन त्याने प्रसार माध्यमांना पाठवले आहे.
गेल्या मंगळवारीच तालिबानने उत्तरे कडील बल्ख प्रांतात एका लष्करी तळावर हल्ला करून सात जवानांना ठार केले होते. अफगाणिस्तानात सध्या कडाक्याची थंडी असून सर्वत्र हालचाली मंदावलेल्या आहेत त्याचा लाभ उठवत तालिबानी गनिम आक्रमकपणे हे हल्ले करीत असल्याने तेथील शांतता प्रक्रियेवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.