काबूल – अफगामिस्तानातील अमू दरया खोऱ्यातून तेलाचे उत्पादन करण्यासाठी तालिबानी प्रशासनाने एका चिनी कंपनीबरोबर करार केला आहे. अफगाणिस्तानचे अर्थकारण सुधारण्याच्या हेतूने तालिबानने चिनी कंपनीची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
इस्लामिक अमिरातचे वरिष्ठ पदाधिकारी आणि चीनचे अफगाणिस्तानमधील राजूदत वॅंग वी यांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. अफगणिस्तानमधील हंगामी खाण उद्योग आणि तेल मंत्री शाहबुद्दीन देलवार याने या कराराबाबत माहिती दिली.
या करारानुसार पहिली 3 वर्षे तेलाचे उत्खनन करण्यासाठी काम केले जाईल. या कालावधीसाठी 540 दशलक्ष डाॅलरची गुंतवणूक केली जाईल आणि तीन प्रांतातील 4,500 चौरस किलोमीटरच्या भूप्रदेशात उत्खनन केले जाणार आहे. सार ए पुल, जावरिजांन आणि फरयाब या तीन प्रांतांमध्ये हे उत्खनन केले जाणार आहे.
या कालावधीत 1 हजार ते 20 हजार टन तेल काढले जाणे अपेक्षित आहे. जर अपेक्षित उत्पन्न मिळवण्यात कंपनीला अपयश आले, तर कंपनीरोबरचा करार संपुष्टात येणार आहे, असेही देलवार याच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे.