प्रतिभावंतांचा संघर्ष! (अग्रलेख)

दोनच दिवसांपूर्वी 49 प्रतिभावंतांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. ही मंडळी कलाकार, दिग्दर्शक, लेखक आहेत. मॉब लिंचिंगच्या घटनांचा पत्रात निषेध करण्यात आला होता. पंतप्रधानांनी हे प्रकार रोखावे अशी मागणी त्यांनी केली. “जय श्रीराम’ या घोषणेचा एखाद्या शस्त्रासारखा वापर केला जात असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. या पत्रावर ज्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत, ते सगळे प्रतिष्ठित आहेत. त्यांच्या कला आणि साहित्य क्षेत्रातील श्रेष्ठत्वाबद्दल कोणाच्याच मनात शंका नाही. ही सगळी आदरणीय नावे असल्यामुळे माध्यमांच्या दृष्टीने ही बातमी लक्षवेधी ठरली. प्रभू रामाचे नाव या मंडळींनी पत्रात लिहिल्यामुळे त्याला धार्मिक अँगलही प्राप्त झाला. या पत्राला 48 तास होण्याच्या आतच चित्रपटसृष्टीतील दुसऱ्या एका गटानेही जाहीर पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी पहिल्या गटातील प्रतिभावंतांवर बोचरी टीका केली आहे. त्यांना काही प्रश्‍न विचारले आहेत.

जमावाकडून केल्या जाणाऱ्या हत्यांबद्दल एक गट नापसंती व्यक्‍त करतो. तर त्यांच्या नापसंतीबद्दल दुसरा गट नापसंती व्यक्‍त करतो. त्यांनी परस्परांना लक्ष्य करण्याऐवजी आणि निवडक मुद्दे घेण्याऐवजी सर्वच विषयांवर, तेही अगोदर ठरवून खुली चर्चा आयोजित करण्यास काय हरकत आहे. किमान त्यांना परस्परांच्या बाजू तरी समजतील. भूमिका स्पष्ट होतील. त्यातून सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न करता येईल. जेव्हा सगळेच विचारवंत विचारविनिमय करून काही सांगत असतील तर राजसत्तेला त्याची दखल घ्यावी लागेल. पण तसे यांना करायचे आहे का? हा प्रश्‍न आहेच. आणि त्यांचा तो हेतूच नाही. त्यांचा हेतू वेगळाच आहे आणि उद्दिष्टेही वेगळी असावीत असा संशय मात्र निर्माण होतो आहे.

विचार केला तर जमावाच्या हिंसाचाराबद्दल बोलणारे हे दोन गट स्वत:च वेगवेगळ्या जमावाचे घटक तर झाले नाहीत ना, आणि त्यांना वैचारिक हिंसाचार माजवायचा तर नाही ना, असेही वाटत राहते. अदूर गोपालकृष्णन हे खूप मोठे नाव आहे. बऱ्याचदा त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यामुळे ते केरळमधील असले तरी संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांच्याबद्दल आदराचे स्थान आहे. ते ज्या भाषेत चित्रपट करतात, ती भाषा अवगत नसणारी मंडळीही त्यांचे चित्रपट आवर्जुन पाहतात. ही जशी त्यांची योग्यता तशीच चित्रपट या माध्यमाची ताकदही आहे. गोपालकृष्णन यांनी धर्माच्या नावावर हिंसाचार करणाऱ्यांवर टीका केली आहे. जय श्रीराम या घोषणेकडे त्यांचा संकेत होता. त्यांना त्यांच्या भावकीतील अर्थात चित्रपट क्षेत्रातील कोणी प्रत्युत्तर दिले नाही.

मात्र, भारतीय जनता पक्षाच्या केरळमधील एका वरिष्ठ नेत्याने उत्तर दिले आहे. ज्यांना या घोषणा सहन होत नसतील त्यांनी चंद्रावर किंवा अन्य ग्रहावर जावे असे सांगण्यात आले आहे. अन्यत्र काही नेत्यांनी जय श्रीरामला विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे असे अनेकदा म्हटले आहे. त्या तुलनेत अदूर गोपालकृष्णन भाग्यशालीच ठरले. चांद्रयान मोहिमेचा प्रभाव असल्यामुळे त्यांना नव्या ठिकाणी जाण्याची सूचना झाली आहे. इतर कलावंत त्या तुलनेत कमी भाग्यशाली आहेत. कारण त्यांच्या या पत्रास्त्राला “पुरस्कार वापसी पार्ट 2′ असे फिल्मी नाव देण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदी सरकारच्या पहिल्या राजवटीपासूनच मॉब लिंचिंग गाजतेय. त्यावेळी असहिष्णुतेचा मुद्दा उपस्थित करत अनेक विचारवंतांनी त्यांना सरकारने दिलेले पुरस्कार परत केले होते. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीच्या तोंडावरच हा प्रकार घडला होता. त्यामुळे त्यातून वेगळा वासही आला. वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न झाला. तसे होतेच असे नाही. मात्र, टायमिंगही महत्त्वाचे असते. तसे त्यावेळी झाले व शंका उपस्थित केल्या गेल्या. त्यावेळी जे प्रतिभावंत पुरस्कार वापसीत आघाडीवर होते, त्यातील बरीच मंडळी आताही पत्रसंवादात आघाडीवर आहे. त्यांना तेव्हा विरोध करणारे आणि आताही विरोध करणारेही तेच आहेत. याचाच अर्थ दोन वेगवेगळ्या विचारधारा मानणाऱ्यांचा हा वैचारिक संघर्ष आहे, असे म्हणायला हवे. मात्र, त्याला ज्या प्रकारे हवा दिली जाते आहे, त्यावरून याला विनाकारण राजकारणाचा वास येऊ लागला आहे. निवडक मुद्दे उपस्थित करून पंतप्रधानांना पत्र लिहिणाऱ्यांनी नक्षलवादाबद्दलही बोलायला हवे.

नक्षलवाद्यांकडून आदिवासींच्या हत्या होतात, तेव्हा कुठे जातो यांचा धर्म येथपासून ते जेएनयूमध्ये देशविरोधी नारे दिले जातात, देशाचे तुकडे करण्याची भाषा केली जाते, जम्मू-काश्‍मीरमध्ये बंदुकीच्या जोरावर शाळा बंद केल्या जातात, तेव्हा हे लोक कुठे असतात, असे दुसऱ्या गटाचे प्रश्‍न आहेत. जय श्रीरामलाच आक्षेप घेतला गेल्यामुळे त्यांनी कदाचित या अँगलने प्रश्‍न विचारले असावेत. प्रश्‍न कोण विचारतोय यापेक्षा प्रश्‍न काय आहे हे नेहमी महत्त्वाचे असते. त्याकडे हिंसाचारात मग तो कोणत्याही स्वरूपाचा असो, दुर्लक्ष होते. गेल्या काही काळात जमावाकडून हत्या झाल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे.

गोवंशाची हत्या केल्याचा आरोप असेल किंवा चोरीच्या संशयावरून असेल जमावाने संशयितांना ठेचून मारले आहे. मध्यंतरी मुलांना पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरूनही गरिबांच्या हत्या झाल्या. अगदी तुरळक घटनांत जात अथवा धर्माच्या नावावर हत्या झाल्या असल्याचे आता तपासातून समोर येऊ लागले आहे. याचा अर्थ दुखणे वेगळे आहे. जमाव आता स्वत:च सत्ताधीशाच्या भूमिकेत गेला आहे. तो स्वत:लाच न्यायालय आणि न्यायाधीश समजू लागला आहे. त्यातून झुंडी निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यांचे एक वेगळेच मानसशास्त्र तयार होतेय. त्यांना चिथावणी देण्याचाच अवकाश ते रक्‍तपिपासू होतात. आपल्याला शिक्षा देण्याचा अधिकार नाही याचेच त्यांना विस्मरण होते. बरे त्या क्षणाच्या रागात ते काही करायला धजावले तरी कुठे थांबायचे हे तरी कळायले हवे. तेही कळत नाही. त्याला कारण हे मानसशास्त्रच. आपण एकेकट्याने काही केले तर आपल्यालाही शिक्षा होणार.

मात्र, झुंडीने काही कृत्य केले तर त्याला बहुतेक प्रसंगात शिक्षाच होत नाही. हेही गेल्या दोन महिन्यांत व त्याही अगोदर झालेल्या अशाच प्रकारच्या घटनांबाबत झालेल्या निवाड्यांवरून स्पष्ट झाले आहे. देशात आजपर्यंत हजारो दंगली झाल्या. त्यात बऱ्याच लोकांचे बळी गेले. मात्र, दंगलकर्ते आणि त्यांचे पाठीराखे सहीसलामत राहिले. हा दोष यंत्रणेचा आहे. मात्र, हे बघूनच झुंडी तयार केल्या जातात आणि स्वत:च निवाडा केला जातो. घोषणेला कोणाचा विरोध नसावा, तर ज्यात माणसे मारली जात आहेत, त्या घटनांना विरोध असावा आणि तो सूज्ञपणे समजूनही घ्यावा. तेच सुदृढ समाजासाठी योग्य आहे. त्याकरिता किमान प्रतिभावंतांनी तरी समंजसपणे एकत्र येऊन विचार करावा. अन्यथा त्यांच्याही वेगळ्याच झुंडी आणि त्याचे वेगळेचमानसशास्त्र विकसित होईल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)