तळेगाव नगरपरिषद मांडणार तुटीचा अर्थसंकल्प?

विरोधी पक्षांचा आरोप : ऑनलाइन सर्वसाधारण सभेला विरोध

तळेगाव दाभाडे – नगरपरिषदेच्या 140 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच तुटीच्या अर्थसंकल्पाचे सादर करण्यात येणार आहे. प्रशासकीय कामकाजाचा लेखाजोखा सभागृहातील सदस्यांना विश्‍वासात न घेता परस्पर मंजूर करण्याचा डाव नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी आखला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते, जनसेवा विकास समिती व तळेगाव शहर विकास समितीच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन करण्यात आला.

तसेच तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभा ऑनलाइन’ न घेता सभागृहात घेण्यात यावी, अशी मागणी देखील यावेळी करण्यात अली. तळेगाव शहर विकास सुधारणा समितीचे गटनेते किशोर भेगडे, विरोधी पक्षनेते गणेश काकडे, जनसेवा विकास समितीचे गणेश खांडगे हे या पत्रकार परिषदेतला उपस्थित होते.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी येथे गुरुवारी (दि.17) रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन ऑनलाइन केलेले आहे. यापूर्वी करोनाच्या काळात देखील अनेक सभांचे आयोजन सुरक्षित अंतर ठेऊन शासकीय अधिकारी व नगराध्यक्षांनी पार पाडले आहेत. या नियोजित सर्वच विषय जनहिताचे असल्याने त्यावर लोकप्रतिनिधींसह सर्वांची सभागृहात खुली चर्चा होणे गरजेचे आहे. त्यासाठी हिी नियोजित सभा ऑनलाइन’ न घेता ती नगरपरिषदेच्या सभागृहात घेण्यात यावी, अशी मागणी किशोर भेगडे यांनी केली.

नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांचा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही. जनहित महत्त्वाचे आहे. वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. नगराध्यक्षांना सार्वजनिक कार्यक्रमास उपस्थित राहण्यास करोनाची भीती वाटत नाही, मात्र नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या विकासाभिमुख विषयावर सभागृहात चर्चा करण्यासाठी करोनाची भीती वाटते. यामागे काहीतरी काळेबेरे आहे, असा आरोप किशोर भेगडे यांनी केला.

सभागृहात चर्चा न करता अशा पद्धतीने आर्थिक कामकाजांना मंजुरी दिली गेली; तर तळेगाव शहराचा विकास 50 वर्षे मागे जाईल, असा आरोप गणेश काकडे यांनी केला. नगरसदस्यांना विश्‍वासात न घेता ही सभा ऑनलाइन घेण्यात येत आहे. करोनाच्या नावाखाली लोकशाहीचा गळा घोटण्याचा कुटील डाव साध्य होऊ देणार नाही, असे गणेश खांडगे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.