वैयक्तिक, सार्वजनिक स्वच्छतेला प्राधान्य…
प्रशासनाची लगीनघाई : आरोग्य विभागाकडून “स्वच्छ सर्वेक्षण’ची मोहीम हाती
तळेगाव दाभाडे -“स्वच्छ सर्वेक्षण’ अंतर्गत तळेगाव नगरपरिषदेने “हेल्दी’ तळेगावकरांसाठी “मिशन स्वच्छता’ हाती घेतली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने शहरात करण्यात येणाऱ्या विविध कामांची निविदा प्रसिद्ध केली असून यामध्ये कचरा संकलनापासून ते सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये नळ बसविणे आदी 15 वेगवेगळ्या कामांचा समावेश करण्यात आला आहे.
देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविणे सुरू केले आहे. घर स्वच्छ राहिले, तर गाव स्वच्छ राहिल… गाव स्वच्छ राहिले तर शहर स्वच्छ राहिल… शहर स्वच्छ राहिले तर राज्य स्वच्छ राहिल, पर्यायाने देशही स्वच्छ राहिल. स्वच्छतेमुळे देशाचे आरोग्यही स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे.
पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत संकल्पाला आता महाराष्ट्राने आणखी व्यापक स्वरुप देण्याचे ठरविले आहे. त्यातूनच आता राज्यातील नागरी भागात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) राबविण्यास सुरूवात होणार आहे.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीमधील कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडी वाहनांवर “म्युझिक सिस्टिम’ बसविणे, नगरपरिषदेच्या वाहनांना वॉशिंग व ग्रीसिंग करणे, नचकीन वस्ती येथे “एफआरपी’ पद्धतीने स्वच्छतागृहासाठी सेप्टीक टॅंकची टाकी खरेदी करणे, तसेच येथील स्वच्छतागृह दुसऱ्या जागी स्थलांतरीत करून फिटिंग करणे, “स्वच्छ सर्वेक्षण 2020′ अंतर्गत तळेगाव शहरामधील जनजागृती आणि स्टीकर लावणे, व्यापारी ठिकाणी नवीन लीटर बिन्स फिटिंगसहित बसविण्यात येणार आहे.
तसेच स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना टोप्या पुरविण्यात येणार आहेत. सर्वेक्षण जनजागृतीकरिता शहरात दोन फुगे (बलून) लावण्यात येतील. तसेच स्वच्छता गीत (जिंगल) तयार करून नागरिकांमध्ये जागृती करण्यात येणार आहे. याशिवाय तळेगाव परिसरात गाव व स्टेशन परिसरात सायकलद्वारे जाहिरात करण्याची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहेत. नगरपरिषदेच्या दोन्ही प्रवेशद्वाराजवळ स्वच्छता कमान तयार करून लावणेचे नियोजन आहे.
स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमधील साफसफाई व्यतिरिक्त कामांसाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येण्याचे नियोजन आहे. नगरपरिषदेच्या सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहांना व उद्यानांना सूचनापेटी बसविण्यात येईल. तसेच सर्व स्वच्छतागृहांमध्ये नळ बसविण्यात येणार असून, त्याकरिता दर देण्यासाठी नगरपरिषदेकडून आरोग्य विभागाकडून स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहेत. नगरपरिषद प्रशासनाकडून स्वच्छ सर्वेक्षणाची जोरदार तयारी सुरू करण्यात आली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यांमधील सर्व शहरांमधील उघड्यावर शौचालयास जात असलेल्या कुटुंबांना शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी आणि शहरांमधील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी राज्यामध्ये “नागरी स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ राबविण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसारच नगरविकास विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत हे अभियान 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत राबविण्यात येणार आहे.