Talegaon Dabhade – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून दरवर्षी पाणीपुरवठा वितरण व स्टेट लाइट तसेच कार्यालय याचे करिता वर्षाला सुमारे ११ कोटी रुपये वीज बिल अदा करावे लागते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम खर्च होत असताना नगरपरिषदेकडून मात्र एकही सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलेला नाही. नगरपरिषदेने सौर ऊर्जा प्रकल्प उभारावेत, असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी आढावा बैठकीत केले. नगर परिषदेची सोमाटणे येथील पाणी योजना, इंद्रायणी पाणी योजना चौरई जलशुद्धीकरण केंद्र, तपोधाम पाणी शुद्धीकरण केंद्र, गोडांबे पंप,स्टेशन तळे पाणी योजना या सर्वांचे मिळून मासिक वीज बिल६२ लाख ६४हजार येत आहेत. तसेच स्ट्रीट लाइटसाठी एकूण ९३ मीटर द्वारे गाव भागातून ५ लक्ष १३ हजार तर स्टेशन भागातून सुमारे ७ लक्ष मासिक वीज बिल अदा करावे लागत. याशिवाय नगरपरिषद कार्यालयासाठी ३ लक्ष ७२ हजार मासिक वीज बिल भरावे लागते. नगर परिषदेस वीज बिलापोटी सुमारे ११ कोटी रुपये वीज बोर्डाच्या तिजोरीत भरावे लागतात. यासाठी नगरपरिषदेस वीज बिलापोटी वार्षिक उत्पन्नातून मोठ्या रकमेची तरतूद करावी लागते. देशभर सर्वत्र सौर ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असून तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून एकही सौरऊर्जा प्रकल्प राबवला जात नाही. वीज बिल (संग्रहित छायाचित्र ) यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी नगर परिषदेने मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा प्रकल्प हाती घ्यावेत व कार्यान्वित करावे असे आव्हान आढावा बैठकीत केले होते. तसेच नगर परिषदेच्या वीज वापराबाबत काटकसरीचे धोरण असावे असे शहरातील नागरिकांचे मत आहे. दहा पटीने वाढला खर्च नगरपरिषदेस १४ व १५ वित्त आयोगाद्वारे विज बिल भरण्यासाठी निश्चित तरतूद होत असते. परंतु ती प्राप्त होईपर्यंत नगरपरिषद फंडातून करावे लागते. त्यामुळे नगर परिषदेच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडतो. नगर परिषदेच्या जुन्या इमारतीच्या कार्यालयामध्ये मासिक बिल सुमारे४० हजार रुपये येत होते. मात्र नूतन नगर परिषदेच्या इमारतीच्या कार्यालयात स्थलांतर झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला सुमारे ३ लाख ७२हजार रुपये बिल येत आहे. म्हणजेच दहा पटीने नव्या इमारतीमध्ये वीज खर्च वाढल्याचं दिसत आहे.