तलाठ्यांवर हलगर्जीपणाचा आरोप “सातबारा’वरुन 152 नावे गायब

वडगाव मावळ – सातबारा संगणकीकरणात वडगाव मावळ परिसरातील 152 मूळ खातेदारांची नावे सातबाराच्या उताऱ्यावरुन गायब झाली असल्याचे समोर आली आहे. तलाठ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही नावे गायब झाली असल्याचा आरोप करण्यात येत असून या प्रकारामुळे खातेदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हस्तलिखित सातबाराच्या उताऱ्याचे संगणकीकृत उतारे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होण्यासाठी मूळ दस्तावेज व उतारे स्कॅनिंग करताना झालेल्या हलगर्जीपणाचा फटका मूळ खातेदारांना बसला आहे. वडगाव मावळच्या तलाठ्यांवर यामुळे स्थानिक नागरिकांमधून रोष व्यक्‍त होत आहे. सातबाराच्या उताऱ्यावरून मूळ खातेदारांची नावे झाल्याने ती नावे पुन्हा उताऱ्यावर चढविण्यासाठी मागील 30 वर्षांपासूनच्या सातबाराचे उतारे व फेरफार आणण्यासाठी सांगितले जात आहे.

अभिलेख कक्षातून हे उतारे व फेरफार काढण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. यामुळे चूक तलाठ्यांची व शिक्षा खातेदारांना मिळत आहेत. त्यातच महाराष्ट्र जमीन महसूल नियम 1966 कलम 151 अंतर्गत प्रकरणे दावे दाखल करावे लागत असून खातेदारांना “तारीख पे तारीख’ दिली जात आहे. खातेदार तहसीलदार कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. त्या खातेदारांचे नाव पुन्हा सातबाराच्या उताऱ्यावर त्वरित नोंद करण्याची मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पंडित उर्फ रघुनाथ जाधव यांनी केली.

तर त्यांच्यावर कारवाई…
याबाबत मावळ तहसीलदार रणजीत देसाई यांनी सांगितले की, हस्तलिखित सातबाराच्या उताऱ्याचे संगणकीकृत उतारे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होण्यासाठी मूळ दस्तावेज व उतारे स्कॅनिंग करताना, चूक झाली असल्यास तलाठ्याने चूक दुरुस्तीचा प्रस्ताव दाखल केल्यास लवकरच सातबाराच्या उताऱ्यावर मूळ खातेदारांचे नाव येईल. जाणूनबुजून चूक केलेल्या तलाठ्यांवर कारवाई करण्यात येईल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)