गोंदिया – औषधाचे पैसे मागितले म्हणून तलाठ्याने मेडिकल मालकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे घडली आहे. अरविंद शेंडे असे जखमी मेडिकल मालकाचे नाव असून प्रकाश चव्हाण असे मारहाण करणाऱ्या तलाठ्याचे नाव आहे. याप्रकरणी देवरी पोलिसात तलाठ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवरी पोलिस स्टेशन समोर अरविंद शेंडे यांचे श्री गणेश मेडिकल आहे. शेंडे हे रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास मेडिकल बंद करत होते त्यावेळी आरोपी प्रकाश चव्हाण तेथे आले. त्यांनी शेंडे यांना औषधे मागितली त्यानुसार औषधे देत शेंडे यांनी चव्हाण यांना औषधाचे 30 रुपये मागितले. यावेळी चव्हाण यांनी तु मला ओळखत नाही का मी कोण आहे? मला पैसे मागतो का असे म्हणत अश्लिल शिवीगाळ करत शेंडे यांना मारहाण केली. याप्रकरणी अरविंद शेंडे यांनी देवरी पोलिसात तक्रार दाखल केली असून तलाठी चव्हाण विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देवरी पोलिस करत आहेत.