टाकळी ढोकेश्वर (वार्ताहर) – पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथील करोनाबाधित व्यक्तीसह तालुक्यात आलेली एक महिला करोनाबाधित निघाल्याने टाकळी ढोकेश्वरसह परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच टाकळी ढोकेश्वर गाव बंद करण्यात आले आहे, असे पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले आहे.
हिवरे कोरडा येथील करोनाबाधित रुग्णाबरोबर ही महिला ठाणे येथून आली होती. त्यावेळी या महिलेस टाकळी ढोकेश्वर येथील विद्यालयात क्वारंटाईन करण्यात आले होते. या महिलेचा स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने टाकळीढोकेश्वरसह परिसरातील जनतेमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिवरे कोरडा (ता. पारनेर) येथील 46 वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली असल्याने बुधवारी (दि.27) सदर महिलेला तपासणीसाठी नगरला पाठविले होते. सदर करोनाबाधित व्यक्ती समवेत ठाणे येथून आलेले आठ जण टाकळी ढोकेश्वर येथील शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. त्या आठही संशयीतांना गुरुवारी (दि.28) रात्री नगर येथे हलविण्यात आले होते. पैकी एक महिला संशयीत आढळल्याचा अहवाल आज प्राप्त होताच टाकळी ढोकेश्वर गाव बंद करण्यात आले.
मेहुणीने दिला वानवळा
सदर करोनाबाधित व्यक्ती टाकळी ढोकेश्वरची मेहुणी आहे. ही महिला ठाण्यावरून टाकळी ढोकेश्वर येथे आली असता तिला क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरून जावू नये, असे आवाहन टाकळी प्रशासनाने ग्रामस्थांना केले आहे.