राजाभाऊ ढाले यांचा आदर्श घेत चळवळ पुढे न्यावी

पुणे – परिवर्तनवादी चळवळीत कार्यरत असणाऱ्यांनी केवळ भावनिक न होता तत्कालीन प्रश्‍न आणि आजचे प्रश्‍न यावर चिंतन अभ्यास करून चळवळ पुढे कशी नेता येईल, याकडे गांभीर्याने विचार केला पाहिजे. आजच्या सामाजिक व राजकीय स्थितीवर परखड लेखन राजाभाऊ ढाले यांनी केले असते. त्यांची उणिव आज समाजाला नक्‍कीच जाणवत आहे, अशा भावना माजी आमदार ऍड. जयदेव गायकवाड यांनी व्यक्‍त केल्या.

दलित पॅंथरचे संस्थापक राजाभाऊ ढाले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सम्यक साहित्य परिषद आणि शिवाई संस्था यांच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, डॉ. मनोहर जाधव, एल. डी. भोसले, डी. जी. कांबळे, हर्षानंद सोनवणे उपस्थित होते. परिषदेचे अध्यक्ष डॉ. धनंजय लोखंडे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. खोरे म्हणाले, राजाभाऊ यांच्या जाण्याने एक वैचारिक पोकळी निर्माण झाली आहे.

राजाभाऊ हे सामाजिक स्थित्यंतराला वैचारिक बळ देणारे असामान्य व्यक्‍तिमत्व होते. सामाजिक पेचांचा शोध घेण्यासाठी आणि मार्ग काढण्यासाठी अशी माणसे राहिली नाहीत, हे प्रकर्षाने जाणवते. तर, डॉ. जाधव यांनी राजाभाऊ यांच्या साहित्यावर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्‍त केली.
अहिरे यांनी परिषदेची माहिती दिली. यावेळी परिषदेचे अविनाश अडसूळ, डॉ. दीपक गरूड, गौतक ससाणे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. सतीश शिरसाठ यांनी, तर आभार दीपक त्रिभुवन यांनी केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×