करोनाच्या भीतीपोटी रुग्णालयांमध्ये गर्दी कमी; नागरिकांकडून केली जातेय टाळाटाळ
पुणे – “अरे किरकोळ आजारी आहे, डॉक्टरांना केला होता फोन त्यांनी सांगितलेले औषध घेतो; पण रुग्णालयात जायला नको.’ “शस्त्रक्रिया महिन्यांनी करू, रुग्णालयात गेल्यावर करोना झाला तर काय’ या भीतीने नागरिक रुग्णालयात जाण्याचे टाळत आहे. त्यामुळे नेहमी रुग्णालयात होणारी गर्दी आता पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी झाल्याचे दिसून येते.
करोना विषाणूने शिरकाव करताच शहरासह राज्यात संचारबंदीचे आदेश जाहीर केले. त्यामुळे शहरातील रस्ते सुनसान झाले. केवळ शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण आणि नातेवाईकांची गर्दी दिसत होती. मात्र, करोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे किरकोळ आजारासाठीही गर्दी करणारे अनेक रुग्णांनी रुग्णालयाची पायरीच चढायाचे थांबविले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांची संख्या कमी झाली आहे. कारण या विषाणूची लागण ज्येष्ठ नागरिकांना अधिक वेगात होतो. त्यामुळे काय होईल ते घरीच होऊद्या पण रुग्णालयात नको, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहे.
गरीब आणि सर्वसामान्यांचे रुग्णालय अशी ओळख असलेल्या ससून रुग्णालयात दररोज हजारो व्यक्ती तपासणीसाठी येतात. 24 तास शस्त्रक्रियांचे सत्र सुरू असते. त्यामध्ये भांडणे, हाणामाऱ्या यासह किरकोळ आजारांची ओपीडी अधिक संख्या असते. मात्र, करोनाच्या धसक्याने गेल्या काही दिवसांत ओपीडीमध्ये 50 टक्क्यांहून अधिक कमी संख्या झाली आहे. ही अवस्था ससून रुग्णालयास खासगी रुग्नालयांमध्येही दिसून येते. त्यामुळे साहजीकच खासगी रुग्णालयांचे आर्थिक नुकसान होणार, पण करोनापेक्षा ते नुकसान परवडेल असे म्हंटल तर वावगे ठरणार नाही. आज गर्दी कमी झाली तर हा प्रादुर्भाव थांबेल.