गावाच्या विकासासाठी सरपंचांनी आईची भूमिका घ्यावी : पेरे

श्रीगोंदा -आपलं मूल चांगलं असावं, दिसावं, बनावं म्हणून आई खूप कष्ट करते. मूल चुकलं म्हणून आईचं प्रेम कमी होत नाही.म्हणून आईप्रमाणे गावासाठी काम करावे. विरोधकांकडे, टिकेकडे दुर्लक्ष करून गावाविषयी प्रेम कमी होऊ देऊ नये. तेंव्हाच गावाचा विकास होईल असे विचार औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा येथील सरपंच भास्करराव पेरे यांनी मढेवडगाव (ता. श्रीगोंदा) येथे मांडले.

पुढे ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व सांगताना सरपंचांची भूमिका फार महत्त्वाची आहे. कामे करताना तळागाळातील लोकांना बरोबर घ्या. समाजाचं मन ओळखून कामे करा. स्वच्छता, आरोग्य, जलसंधारण, वृक्षारोपण, शिक्षण या कामांना प्राधान्य द्या असेही आवाहन केले. वेगाने आदर्श गावाकडे वाटचाल करीत, असलेल्या मढेवडगाव ग्रामपंचायतीच्या विकासकामांना भेट व ग्रामस्थांना मार्गदर्शनपर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

त्यांच्या हस्ते जलशुद्धीकरण प्रकल्प, पेव्हर ब्लॉक, शाळेची संरक्षक भिंत या कामांचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी 10 वी, 12 वीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामविकासासाठी आईच्या स्मरणार्थ एक्कावन्न हजार रुपये देणारे विलास कुरूमकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदिनी वाबळे या होत्या.

पंचायत समिती सदस्य जिजाबापू शिंदे, सरपंच महानंदा मांडे, उपसरपंच गणेश मांडे, प्रा. फुलसिंग मांडे, ग्रामसचिव गोरक्ष गायकवाड, पोपट उंडे, संतोष गुंड, प्रकाश उंडे, नंदू साळवे, साहेबराव उंडे, अंबादास मांडे, गेणबा मांडे, अमोल गाढवे, रावसाहेब मांडे, राजेंद्र नागवडे, सचिन उंडे, बाळासाहेब बनकर, ग्रामपंचायत सदस्य व महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन राहूल साळवे यांनी, तर आभार गोरख उंडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)